आता खिलाडी कुमारही Man Vs Wild मध्ये झळकणार


बेअर ग्रिल्सचा डिस्कव्हरी वाहिनीवरील Man Vs Wild या कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची जंगल सफारी या कार्यक्रमाच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. या भागांचे चित्रीकरणही त्यांनी पूर्ण केले आहे. आता या कार्यक्रमात त्यांच्यापाठोपाठ बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार देखील या कार्यक्रमात दिसणार आहे. तो या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी कर्नाटकमधील म्हैसूर येथे रवाना झाला आहे.

नेहमीच आपल्या साहसी स्टंटसाठी अक्षय कुमार ओळखला जातो. त्याचबरोबर बॉलिवूडचा फिटेस्ट मॅन म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळेच त्याला Man Vs Wild या कार्यक्रमात पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. त्याची बेअर ग्रिल्ससोबतची जंगलातील सफर कशी राहणार, हे आता आगामी भागातच पाहायला मिळेल.

त्याच्या कामाबाबत बोलायचे झाले तर, यावर्षी ‘सूर्यवंशी’, ‘लक्ष्मी बाँब’, ‘पृथ्वीराज’ यांसारख्या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबर त्याने पुढच्या वर्षीच्या चित्रपटांचीही तारीख जाहीर केली आहे. यामध्ये ‘बेलबॉटम’ आणि ‘बच्चन पांडे’ यांसारख्या चित्रपटाचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याच्या गाजलेला म्युझिक व्हिडिओ ‘फिलहाल’ या गाण्याचा दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर या गाण्याचे दुसरे पोस्टर शेअर केले होते.

Leave a Comment