इंदिरा गांधींबाबत जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य


बीड – बीड येथील संविधान बचाव महासभेत बोलताना राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एकेकाळी इंदिरा गांधींनी देखील देशात असाच लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केल्याचे म्हटले आहे. देशात आज ठिकठिकाणी विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. अनेक महाविद्यालयात हे हल्ले होत आहेत. हे सर्व अचानक का होत आहे ? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

देशातील सध्याची परिस्थिती पाहता, असाच लोकशाहीचा गळा एकेकाळी घोटण्याचा प्रकार इंदिरा गांधींनीही केला होता. कोणीही त्यावेळी देशात असणाऱ्या परिस्थितीबाबत बोलायला तयार नव्हते. पण इंदिरा गांधी यांच्या धोरणाविरोधात अहमदाबाद आणि पटना येथील विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. जयप्रकाश नारायण यांचे त्याचकाळात आंदोलन सुरु झाले आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. हा इतिहास परत एकदा महाराष्ट्रात आणि देशात घडेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जेव्हा देशातील आजची परिस्थिती बदलेल तेव्हा त्याचे श्रेय जेएनयु, हैद्राबाद यूनिवर्सिटी यांना द्यावे लागेल, असे आव्हाड यावेळी म्हणाले. विद्यार्थी आज बिनदिक्कतपणे बाहेर पडत आहेत. कायदा लोकांना समजावून सांगत आहेत. आज जरी त्यांची संख्या कमी असेल, तरीही हळूहळू ती वाढेल आणि हेच विद्यार्थी देशाला दुसरी आझादी मिळवून देतील, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

Leave a Comment