जगातील सर्वात वाईट रहदारीच्या टॉप 10 यादीत मुंबई आणि पुणे

लोकेशन टेक्नोलॉजी एक्सपर्ट संस्था टॉमटॉमने जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या असणाऱ्या शहरांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जगातील सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या टॉप-10 शहरांमध्ये 4 भारतीय शहरांचा समावेश आहे.

वाहतूक कोंडीच्या बाबतीत बंगळुरूने मुंबई आणि पुण्याला देखील मागे टाकले आहे. वाहतूकीच्या बाबतीत बंगळुरू सर्वात खराब शहर असून, 2019 मध्ये गर्दीमुळे चालकांनी सरासरी 71 टक्के अधिक वेळ वाहतुकीत घालवला आहे.

टॉमटॉमने जगातील 57 देशातील 416 शहरांचे सर्वेक्षण केले आहे. बंगळुरूनंतर टॉप-10 शहरांमध्ये चौथ्या क्रमांकावर मुंबई असून, येथील चालकांनी सरासरी 65 टक्के अधिक वेळ वाहतुकीत घालवला. 5व्या क्रमांकावर पुणे शहर तर 8व्या स्थानावर दिल्ली आहे. 2017 च्या तुलनेत 2019 मध्ये दिल्लीची वाहतूक कोंडी थोडी कमी झाल्याचे दिसून येत आहे. 2017 ला या यादीत दिल्लीचा क्रमांक सहावा होता.

दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये शुक्रवारी सायंकाळी 7 ते 8 वाजता सर्वाधिक वाहतूक कोंडी होती. 2019 मध्ये दिल्लीकरांना वाहतुकीमध्ये 190 तास म्हणजे 7 दिवस 22 तास वाया घालवले आहेत. तर बंगळुरुच्या चालकांनी 243 तास व मुंबईकरांनी 8 दिवस 17 तास वाहतुकीमध्ये वाया घालवले आहेत.  वाहतुकीमुळे पुणेकरांचे 8 दिवस 1 तास वाया गेला आहे.

मागीलवर्षी मुंबईकरांसाठी 9 सप्टेंबर तर पुणेकरांसाठी 2 ऑगस्ट सर्वोधिक वाहतूक कोंडी असलेला दिवस होता.

सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेली टॉप-10 शहर –

  1. बंगळुरु
  2. मनीला
  3. बोगोटा
  4. मुंबई
  5. पुणे
  6. मॉस्को
  7. लिमा, पेरू
  8. दिल्ली
  9. इस्तांबूल
  10. जकार्ता

Leave a Comment