शृंगेरीचे प्राचीन शारदंबा मंदिर


फोटो सौजन्य यु ट्यूब
आज वसंतपंचमी. म्हणजे वसंत ऋतूची सुरवात. आजच्या दिवशी सरस्वतीच्या पूजेचे विशेष महत्व आहे. कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्हातील शृंगेरी येथे तुंगा नदीच्या काठी ११०० वर्षे जुने शारदाम्बा मंदिर आहे. हे मंदिर आदि शंकराचार्यांनी ८ व्या शतकात स्थापन केल्याचे आणि त्यांनी स्वतः येथे शारदेची पूजा केल्याचे सांगितले जाते. वसंत पंचमीला येथे मोठी गर्दी होते.

या मंदिरातील मूळ शारदा किंवा सरस्वती मूर्ती चंदनाच्या लाकडापासून बनविली गेली होती. १४ व्या शतकात सोन्याच्या मूर्तीची स्थापना केली गेली. याच मंदिरात एक स्फटिक लिंग असून हे लिंग खुद्द महादेवाने शंकराचार्य यांना दिले होते असा विश्वास आहे. शारदाम्बा मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार केला गेला आहे.


देवी शारदंबा सरस्वतीचा अवतार असून तिने पृथ्वीवर उमाभारती रुपात अवतार घेतला होता असे पुराणे सांगतात. या मंदिरात सरस्वती पूजा केली की त्या व्यक्तीला ब्रह्मा, विष्णू महेश यांच्या बरोबर पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वतीचा आशीर्वाद लाभतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात लहान मुलांचा अक्षराभ्यास म्हणजे मुळाक्षरे शिकविण्याची सुरवात अनेक पालक करतात. २ ते ५ वर्षाची मुले पाटी पेन्सिल घेऊन मुळाक्षरे गिरवण्याची सुरवात येथे करतात आणि त्यांचे पालक देवी सरस्वती आणि गुरु प्रार्थना करून मुलांना ज्ञान आणि शिक्षण चांगले मिळूदे अशी प्रार्थना करतात.

शंकराचार्य त्यांच्या शिष्यांसह भ्रमण करत असताना शृंगा गिरी येथे पोहोचले तेव्हा एका गर्भार बेड्कीला एक नाग फडा पसरून उन्हापासून संरक्षण देत असलेला त्यांना दिसला. या दृश्याचा प्रभाव पडल्याने शंकराचार्यांनी येथे शारदा पीठम स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ही कथा सांगणारी एक मूर्ती येथे आहे. आदि शंकराचार्यांनी येथे १२ वर्षे वास्तव्य केले होते.

Leave a Comment