अर्थ संकल्पाचे वैशिष्ट असलेल्या लाल ब्रीफकेसचा इतिहास


फोटो सौजन्य न्यूज १८
येत्या १ फेब्रुवारीला आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२०-२१ सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आल्यावर अर्थमंत्री अर्थसंकल्प कागदपत्रे असलेली लाल रंगाची सुटकेस प्रथम पार्लमेंटमध्ये दाखवितात हे आपण अनेकदा पाहतो. या लेदरच्या ब्रीफकेस बद्दल नेहमीच चर्चा होते पण या ब्रीफकेसचा इतिहास मात्र अनेकांना माहिती नाही.


बजेट हा शब्द मूळ फ्रेंच बोगोट वरून आला असून त्याचा अर्थ आहे लेदर ब्रीफकेस. अर्थसंकल्प सादर करताना अशी लेदर ब्रीफकेस आणण्याची परंपरा ब्रिटन मधून सुरु झाली. त्यासाठी सर्वप्रथम ग्लॅडस्टोन बॉक्सचा वापर केला गेला होता. १८६० मध्ये ब्रिटीश बजेट चीफ विलियम ग्लॅडस्टोन यांनी लाल रंगाच्या सुटकेसचा वापर केला त्यावर सोनेरी रंगात क्वीन मोनोग्राम होता. ब्रिटन मध्ये अर्थसंकल्पाचे कागद लाल ब्रीफकेस मधून आणले जातात पण पहिला अर्थमंत्री हीच ब्रीफकेस पुढच्या अर्थमंत्र्याला देतो. भारतात मात्र प्रत्येक अर्थमंत्री स्वतंत्र ब्रीफकेस वापरतात.


मुळची, खरी, ग्लॅडस्टोन बॉक्सची हालत अतिशय खराब झाल्याने २०१० मध्ये ब्रिटीश सर्व्हिसमधून ती रिटायर केली गेली आहे. ब्रिटनचे बजेट चीफ ग्लॅडस्टोन यांचे भाषण अतिशय मोठे आणि प्रभावशाली असे. भाषणाशी संबंधित कागद ते या ब्रीफकेस मध्ये ठेवत असत आणि त्यामुळे ही ब्रीफकेस चर्चेत असे. भारतात बजेट सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री त्यांची लाल ब्रीफकेस पार्लमेंट मध्ये दाखवितात तर ब्रिटन मध्ये राजकोष चान्सलर ११ डाउनिंग स्ट्रीटसमोर ब्रीफकेस सह फोटो काढतात.

१९७० ते २०१९ पर्यंतच्या काळात भारतात विविध अर्थमंत्र्यांनी हार्ड बाउंड ब्रीफकेसचा वापर केला मात्र २०१९ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही परंपरा मोडीत काढून ब्रीफकेस ऐवजी बहीखाते म्हणजे बाडाचा वापर केला आणि तोही मोठा चर्चेचा विषय ठरला.

Leave a Comment