U19 World Cup : भारतीय संघाची उपांत्य फेरीत धडक


पोचेफस्ट्रम : अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा 74 धावांनी धुव्वा उडवून प्रियम गर्गच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 234 धावांचे माफक आव्हान दिले होते. पण कांगारुंचा डाव कार्तिक त्यागी आणि आकाश सिंगच्या माऱ्यासमोर 159 धावांत आटोपला.

कार्तिक त्यागीने चार तर आकाश सिंगने तीन फलंदाजांना माघारी धाडले. तत्पूर्वी भारताने मुंबईकर यशस्वी जैस्वाल आणि अथर्व अंकोलेकरच्या दमदार अर्धशतकांमुळे 50 षटकांत नऊ बाद 233 धावांची मजल मारली होती. 6 चौकार आणि 2 षटकारांसह यशस्वी जैस्वालने 62 धावांची खेळी केली. तर पाच चौकार आणि एका षटकारासह नाबाद 55 धावांचे अथर्वने महत्वपूर्ण योगदान दिले. भारताला या दोघांच्या दमदार खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 234 धावांचे आव्हान ठेवता आले.

दरम्यान नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारताचे पहिले तीन फलंदाज प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 54 धावांत माघारी परतले होते. पण त्यावेळी एका बाजूने यशस्वीने दमदार फलंदाजी केली. यशस्वी बाद झाल्यावर अथर्वने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अखेरच्या षटकापर्यंत अथर्वने फलंदाजी केली. भारतीय संघाला धावसंख्या उभारून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.

Leave a Comment