मला ‘भारताची ग्रेटा’ म्हणू नका – लिसीप्रिया कंगुजम

मणिपूरची 8 वर्षीय पर्यावरणवादी लिसीप्रिया कंगुजमला ‘भारताची ग्रेटा थनबर्ग’ म्हटले जाते. मात्र लिसीप्रियाने ट्विट करत आपल्याला हे उपनाव देण्यात येऊ नये असे म्हटले आहे. तिने याबाबत असंख्य ट्विट करत आपले म्हणणे मांडले.

तिने ट्विट करत सांगितले की, मला भारताची ग्रेटा थनबर्ग म्हणणे थांबवा. 2 तरूण पर्यावरणवादी एकच लक्ष्य साध्य करत आहेत. मात्र माझी स्वतःची एक वेगळी ओळख आणि कथा आहे.

मी ही चळवळ जुलै 2018 ला ग्रेटाने सुरुवात करण्याच्या आधी सुरू केली आहे, असेही तिने एक व्हिडीओ शेअर करत सांगितले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ती संसदेच्या बाहेर पर्यावरण बदलाविषयी कायदा पास करावा, अशी मागणी करणारे बॅनर घेऊन बसली आहे.

तिने ट्विटमध्ये सांगितले की, मी 7 वर्षांची असताना फेब्रुवारी 2019 पासून दर आठवड्याला संसदेसमोर निदर्शन करण्यासाठी शाळा देखील सोडली. मी माझ्या छोट्या वयात सर्व काही केवळ ‘ग्रेटा ऑफ इंडिया’ म्हणून ओळखावे यासाठी गमवले नाही, असेही ती म्हणाली.

17 वर्षीय स्विडीश पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने देखील ऑगस्ट 2019 पासून स्विडीश संसदेबाहेर पर्यावरणासाठी निदर्शन करण्यासाठी दर शुक्रवारी शाळेत जाण्याचे बंद केले होते.

जर तुम्ही मला भारताची ग्रेटा म्हणत असाल तर तुम्ही माझी कथा समोर आणत नसून, ती संपुष्टात आणत आहात, असेही ती ट्विटमध्ये म्हणाली.

Leave a Comment