पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या प्रशांत किशोर यांची जदयूमधून हकालपट्टी


पाटणा: अखेर जनता दल युनायटेडमधून (जदयू) प्रशांत किशोर यांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्यासोबत पवन वर्मा यांच्यावर देखील कारवाई करण्यात आल्याची माहिती पक्षाचे महासचिव आणि प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी दिली आहे.

या दोघांवर पक्षाची शिस्त मोडणे आणि पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल ही कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत किशोर यांनी मागील काही महिन्यांपासून वादग्रस्त वक्तव्य केली होती. पक्षाच्या निर्णयाविरोधात त्यांची ही वक्तव्य असल्याचे त्यागी यांनी सांगितले. पक्ष अध्यक्ष नितीश कुमार यांच्याविरोधातही प्रशांत किशोर यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रशांत किशोर यांची राजकीय रणनीतीकार म्हणून ओळख आहे. त्यांनी निवडणुकांमध्ये विविध राजकीय पक्षांसाठी रणनीतीकार म्हणून काम केले होते. प्रशांत किशोर यांनी काही वर्षापूर्वीच नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षात प्रवेश केला होता. एनआरसी व सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात प्रशांत किशोर यांनी वारंवार भूमिका मांडली होती. त्यानंतर या दोन मुद्यांवरुन प्रशांत किशोर यांनी वारंवार केंद्र सरकार व भाजपवर हल्लाबोल केला होता. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यात ट्विटर वॉरही रंगले होते. प्रशांत किशोर हे पक्षात कायम राहिले तरी आम्हाला काही त्रास नाही आणि पक्ष सोडून गेले तरी काही विशेष त्रास होणार नसल्याचे सूचक वक्तव्य नितीश कुमार यांनी केल्यानंतर जदयूने त्यांच्यावर ही कारवाई केली.

Leave a Comment