जदयू नेत्याने केली प्रशांत किशोर यांची कोरोना व्हायरसशी तुलना


पटना – सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) यासह अनेक मुद्यांवरून जनता दल युनायटेडमध्ये (जदयू) मतभेद निर्माण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यात वाद सुरू आहेत. प्रशांत किशोर हे गेल्या काही दिवसांपासून नितीशकुमार यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहेत. जदयूमध्ये प्रशांत किशोर यांच्या भूमिकेवर नाराजी आहे. प्रशांत किशोर यांच्यावर टीका करताना जदयूचे नेते अजय आलोक यांनी त्यांची तुलना थेट कोरोना व्हायरसशी केली आहे.

प्रशांत किशोर हे विश्वासपात्र नाही. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांचा विश्वास त्यांना जिंकता आला नाही. आपसाठी ते काम करतात. राहुल गांधींशी बोलतात. ममता बॅनर्जी यांच्यासोबतही असतात, अशा माणसावर कोण विश्वास ठेवेल? आम्हाला आनंद आहे की, आपल्यासोबत हा कोरोना व्हायरस आहे. कुठे पाहिजे ते तिथे जाऊ शकतात, असे अजय आलोक यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरून प्रशांत किशोर ट्विटरद्वारे पक्षाच्या निर्णयावर सतत प्रश्न उपस्थित करत होते. दिल्लीत भाजप आणि जदयूच्या युतीवरसुद्धा प्रशांत किशोर यांनी निशाणा साधला होता. याच मुद्यावर नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर यांच्यावर टीका केली होती. जर कोणी ट्विट करत असेल, तर ते करू द्या. जर कोणाला पक्षातून जायचे असेल तर ते जाऊ शकतात, असे ते म्हणाले होते.

Leave a Comment