स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरावर ‘इंडिगो’सह ‘एअर इंडिया’ची ६ महिन्यांची बंदी


नवी दिल्ली – स्टँडअप कॉमेडिअन असलेल्या कुणाल कामरावर इंडिगो आणि एअर इंडिया या विमान कंपन्यांनी ६ महिन्यांची बंदी घातली आहे. त्याच्यावर ही कारवाई पत्रकार अर्णब गोस्वामी याच्यासोबत विमानात केलेल्या गैरवर्तनामुळे करण्यात आली आहे.

इंडिगोने याबाबतची माहिती देताना मुंबई ते लखनऊ प्रवास करणाऱ्या ६ई ५३१७ या विमानात झालेल्या प्रकारानंतर, आम्ही कुणाल कामरा यांना इंडिगो विमानातून प्रवास करण्यावर सहा महिन्यांची बंदी घालत आहोत. अशा आशयाचे ट्विट केले आहे.

असे इंडिगोने जाहीर करताच, त्यांच्या पावला पाऊल ठेवत एअर इंडियानेही अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी खबरदारी म्हणून कुणाल कामराला एअर इंडियाच्या विमानांमधून प्रवास करण्यास बंदी घातली. पुढील सूचना मिळेपर्यंत ही बंदी लागू करण्यात आली असल्याचे कंपनीने ट्विट करत सांगितले.

इंडिगो विमानाने रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी हे प्रवास करत असताना, कुणाल कामराने त्यांच्यासोबत जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न केला होता. कामराने या सर्व प्रकाराचा व्हिडिओ बनवत, त्यांना काही प्रश्नही विचारले होते. अर्णब यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, त्यानंतर त्यांना कामराने “भित्रा पत्रकार” म्हटले होते. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ त्याने ट्विटरवर अपलोड केला होता.

Leave a Comment