फेडररच्या सामन्यात अंपायर ठरली आकर्षणाचे केंद्र


फोटो सौजन्य एनबीटी
मंगळवारी ऑस्ट्रेलिया ओपेन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी उपउपांत्य सामन्यात स्वित्झर्लंडचा स्टार खेळाडू रॉजर फेडरर याने अटीतटीचा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करून रसिकांची मने जिंकली असली तरी या सामन्यात अंपायर मॅरीजना वेलजोवीच जरा अधिकच भाव खाऊन गेल्याचे दिसले. तिच्याबद्दल ट्विटरवर युजर्सनी चर्चा करताना तिच्या सौंदर्याची आणि स्पष्ट व दबावाखाली निर्णय न घेण्याच्या वृत्तीची भरभरून स्तुती केली.

मॅरिजाना सर्बियाची आहे. कॅनडा टेनिस स्टार जिनी बुशाल्दन हिलाही मॅरीजानाच्या सौंदर्याचा मोह आवरता आला नाही आणि तिने रॉजरची मॅच अंपायर फारच सुंदर आहे असे ट्विट केले. विशेष म्हणजे या सामन्यात रॉजर एका निर्णयाबद्दल काही अपशब्द बोलला तेव्हा तिने त्याला पेनल्टी ठोठावली. रॉजरने लाईनवूमनला तो काही गैर बोलला काय असे विचारले तेव्हा मॅरिजानाने रॉजरला, तू काय बोललास हे मी स्पष्ट ऐकले आहे आणि मी पेनल्टीचा निर्णय बदलणार नाही असे सुनावले. तिच्या या धाडसाचे सर्वानीच कौतुक केले.

मॅरीजानाने २०१५ मध्ये अंपायरिंग साठी गोल्ड बॅज मिळविला आहे. तिने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरी तसेच २०१९ मध्ये विम्बल्डन महिला एकेरीसाठी अंपायरिंग केले आहे. फेडररची गाठ उपांत्य फेरीत गतविजेत्या नोवाक जोकोविच बरोबर पडणार आहे.

Leave a Comment