भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी द्यावा लागणार ‘धर्मा’चा पुरावा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून येणाऱ्या गैर मुस्लिम शरणार्थींना भारतीय नागरिकत्व मिळवणे सोपे झाले आहे. मात्र आता या देशातील गैर मुस्लिम शरणार्थींना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करताना धर्माचा पुरावा सादर करावा लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच, हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि पारसी अर्जधारकांना ते 31 डिसेंबर 2014 अथवा त्याच्या आधी भारतात राहत असल्याचा देखील पुरावा द्यावा लागणार आहे.

एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, सीएए अंतर्गत ज्यांना भारतीय नागरिकत्व हवे असेल, त्यांना आपल्या धर्माचा पुरावा द्यावा लागेल. सीएए अंतर्गत जारी करण्यात येणाऱ्या नियमावलीत याचा उल्लेख केला जाईल.

सीएएनुसार, धार्मिक छळामुळे 31 डिसेंबर 2014 पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेले हिंदू, शीख, बुद्ध, जैन, पारसी व ख्रिश्चन नागरिकांना बेकायदेशीर स्थलांतर केले असे समजले जाणार नाही व त्यांना भारतीय नागरिकता दिली जाईल.

आसाममध्ये नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी केवळ 3 महिन्यांचा कालावधी मिळू शकतो. आसामसाठी काही विशिष्ट तरतूदी देखील केल्या जाऊ शकतात.

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि अर्थमंत्री हिमंत विश्व सरमा यांनी देखील अर्ज करण्यासाठी विशिष्ट कालावधी ठेवावा अशी मागणी केली होती. हे पाऊल आसाममध्ये सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनाला लक्षात घेऊन उचलण्यात आले आहे.

Leave a Comment