काही देशांमधील अजब कायदे


लहान मुलांच्या गोष्टींमध्ये असलेली चेटकीण मोठ्या झाडूवर बसून आकाशात उड्डाण करते हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पण ह्या चेटकिणीचा झाडू दीडशे मीटर पेक्षा जास्त उंचीवरून उडता काम नये असा कायदा असल्याचे कोणी आपल्याला सांगितले तर आपल्याला काय वाटेल? पण असा कायदा स्वाझीलँड देशामध्ये आहे. खरे तर एक प्रायव्हेट डिटेक्टीव्ह टेहळणी करण्याकरिता एका ड्रोनचा वापर करीत असताना आढळला. त्याला समज देताना स्वाझी एव्हियेशन अधिकाऱ्याने ‘ ड्रोनच काय, पण चेटकीण देखील तिच्या झादुवरून दीडशे मीटर च्या वर उडताना दिसली नाही पाहिजे ‘ असे शब्द वापरले. स्वाझीलँडच्या नागरीकांचा चेटूक, जादू टोणा असल्या कल्पनांवर अपार विश्वास असल्याने त्याने हे उदाहरण दिले असल्याचे समजते.

न्यूझीलंड देशामध्ये परमाणु हत्यारांविरोधात कडक कायदे आहेत. हे कायदे इतके कडक आहेत, की न्यूझीलंड च्या अधीन समुद्रकिनाऱ्यालागत परमाणु हत्यारांनी परिपूर्ण नौका येण्यास देखील मनाई आहे. पण न्युझीलंड मधील शिक्षण क्षेत्रात मात्र या कायद्यामध्ये सूट देण्यात आली आहे. येथे उच्चशालेय शिक्षण देणाऱ्या कोणत्याही शाळेला एक पाऊंड वजनाचे युरेनियम आणि थोरियम हे परमाणु हत्यारांमध्ये वापरले जाणारे धातू ठेवण्यास परवानगी आहे. विद्यार्थ्यांना या धातूंचा अभ्यास करता यावा, या करिता ही परवानगी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रलिया मधील क्वीन्सलँड या प्रांतामध्ये राहून जर तुम्हाला ससा पाळायचा असेल, तर तुम्हाला जादू करता येते हे तुम्ही सिद्ध करून दाखवावे लागेल. इथे तसा कायदाच आहे ! या कायद्याच्या मागचे खरे कारण असे, की या प्रांतामध्ये सश्यांची संख्या खूपच वाढली होती. हे ससे येथील शेतांमध्ये शिरून पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान करित असत. या शेतांचा सश्यांपासून बचाव करण्याकरिता ५५५ किलोमीटर लांब असे कुंपण या राज्यामध्ये उभारण्यात आले. या कुंपणामुळे सुमारे २८,००० चौरस किलोमीटर च्या क्षेत्रामध्ये ससे शिरू शकत नाहीत. त्याशिवाय नागरिकांनी ससे पाळणे हा ही कायद्याने गुन्हा आहे. जर कोणाजवळ पाळीव ससे आढळले, तर त्यांची सहा महिन्यांकरिता सरळ तुरुंगात रवानगी केली जाते. मात्र जर कोण्या जादुगाराला आपल्या जादूच्या प्रयोगांसाठी ससे ठेवायचे असतील, तर त्यांना मात्र या कायद्यातून सूट दिली गेली आहे.

सप्टेंबर २०१६ साली सॅमसंग कंपनीने गॅलक्सी नोट ७ हा फोन बाजारातून परत काढून घेतला. कारण हे, की या फोनची लिथियम बॅटरी खूप गरम होऊन त्याचा स्फोट होत असे. ज्या ग्राहकांचे फोन कंपनीकडे परत आले, त्या ग्राहकांना कंपनीने आधीच्या फोन च्या बदल्यात दुसरे फोन दिले. पण जेव्हा या ही फोनचे स्फोट होण्याच्या घटना समोर आल्या, तेव्हा मात्र अमेरिकेने हा फोन विमानप्रवासात नेण्यावर कायद्याने बंदी आणली. प्रवाश्यांच्या सामानामध्ये हा फोन सापडल्यास या कायद्याअंतर्गत जबर दंड वसूल करण्यात येणार असल्याची सूचना जारी करण्यात आली.

चीनमधील कायद्यांमध्ये असंख्य पळवाटा आहेत. त्याचमुळे अति श्रीमंत लोकांच्या हातून गुन्हे घडले तर त्यांना स्वतःऐवजी पैसे देऊन दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला शिक्षा भोगण्यासाठी पाठविता येते. या प्रक्रियेला चीनमध्ये ‘ दिंग झुई ‘ असे म्हणतात. जरी ही प्रक्रिया कायद्याला धरून नसली, तरी हा प्रकार तिथे सर्रास पहावयास मिळतो. चीनमधील न्यायालये गुन्हेगारांना क्वचितच मुक्त करताना आढळतात, त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून अनेक श्रीमंत लोक आपल्या जागी आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्याकरिता आपल्यासारख्याच दिसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला पाठवितात. भरपूर पैसे मोबदला म्हणून त्या व्यक्तीला दिले जातात.

Leave a Comment