या सॉफ्टवेअरद्वारे हॅक झाला होता बेझॉस यांचा फोन

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या आयफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आलेल्या एका व्हिडीओद्वारे त्यांचा फोन हॅक करण्यात आला होता. या हॅकिंगचा आरोप सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यावर करण्यात आला आहे. मे 2018 मध्ये ही हॅकिंग करण्यात आली होती.

पाठवण्यात आलेल्या व्हिडीओद्वारे स्पायवेअर पिगासस पाठवण्यात आला होता. जो व्हिडीओवर क्लिक करताच बेझॉस यांच्या फोनमध्ये इंस्टॉल झाला. मात्र एनएसओ ग्रुपने या हँकिंगमध्ये पिगासस असल्याचे आरोप फेटाळले आहेत.

2019 मध्ये देखील पिगासस स्पायवेअरद्वारेच भारतासह जगभरातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची हेरगिरी झाली होती. याच पिगाससचा वापर मध्य प्रदेशच्या हनीट्रॅप प्रकरणात देखील करण्यात आला होता.

हे सॉफ्टवेअर फोनमधील कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग, एसएमएस आणि अन्य गोष्टींवर लक्ष ठेऊ शकते.

पिगासस नक्की काय आहे ?

एनएसओ ग्रुप/ओ सायबर टेक्नोलॉजीने या स्पायवेअरला तयार केले आहे. पिगाससचे दुसरे नाव क्यू सुट आहे. पिगासस युजर्सच्या परवानगी शिवाय फोनमध्ये इंस्टॉल होतो. हा स्पायवेअर फोनमध्ये इंस्टॉल झाल्यावर फोनमधून काढणे अवघड आहे.

हे स्पायवेअर तुमच्या खाजगी माहितीवर लक्ष ठेवते. या स्पायवेअरचे कोणतेच चिन्ह दिसत नसल्याने, याला ओळखणे देखील अवघड जाते. हे सॉफ्टवेअर पासवर्ड, कॉन्टॅक्ट्स, कॅलेंडर, मेसेज, मायक्रोफन, कॅमेरा आणि विविध मेसेजिंग अ‍ॅप्सवर लक्ष ठेवते. पिगासस युजरचे जीपीएस लोकेशन देखील ट्रॅक करते.

रिपोर्टनुसार, या सॉफ्टवेअरची किंमत जवळपास 56 कोटी रुपये आहे. या किंमतीत या स्पायवेअरचे एक वर्षांसाठी लायसन्स मिळते. एका लायसन्सवर वर्षाला 500 फोन मॉनिटर करता येतात. पिगाससद्वारे एकावेळी 50 फोनवर लक्ष ठेवता येते. हे स्पायवेअर तुमच्या परवानगी व नकळत फोनला चालू-बंद करू शकते, फॉर्मेट देखील करू शकते.

Leave a Comment