रेल्वेच्या सुरक्षेसाठी आता 300 श्वान होणार डिजिटल

दुबईप्रमाणेच आता भारतात रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) कुत्र्यांवर कॅमेरे लावून रेल्वे व रेल्वे स्टेशनवर लक्ष ठेवणार आहे. याची सुरुवात 26 जानेवारीला विशाखापट्टनम येथून करण्यात आलेली आहे. विशाखापट्टनमच्या डिव्हिजनमध्ये एका महिन्याच्या ट्रायलनंतर 4 कुत्र्यांवर कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॅमेऱ्यांचे यश पाहून अन्य प्रमुख स्टेशन्सवर देखील कॅमेरे लावलेल्या कुत्र्यांना तैनात केले जाईल.

कुत्र्यांवर दोन प्रकारचे कॅमेरे लावले जातील. एक कुत्र्याच्या वरच्या बाजूला व दुसरा कॅमेरा गळ्यात बांधला जाईल. विशाखापट्टनम येथे कुत्र्यांच्या वरच्या बाजूला कॅमेरा लावण्यात आले आहेत. मात्र जेव्हा कुत्रे अरुंद गल्लीत जातील तेव्हा हे कॅमेरे त्यांच्या गळ्यात बांधले जातील. या कॅमेऱ्यांना हँडलर 10 मीटर अंतरापासून स्क्रिनवर पाहू शकेल. कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्डिंग केले जाईल, जेणेकरून हँडलर ऑफिसमध्ये देखील रेकॉर्डिंग पुन्हा पाहू शकेल.

रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक राजेश दत्त बाजपेयी म्हणाले की, आरपीएफजवळ देशभऱात 298 कुत्रे आहेत. लवकरच सर्व कुत्र्यांवर कॅमेरे लावले जातील. या कॅमेऱ्यांना जीपीएसद्वारे कंट्रोल रुमशी जोडले जाईल. यामुळे कंट्रोल रुममध्ये बसून लक्ष ठेवता येईल. एका कॅमेऱ्याची किंमत जवळपास 17 हजार रुपये आहे.

Leave a Comment