लोकप्रियतेच्या बाबतीत अजय देवगण अव्वल स्थानी विराजमान


बॉलीवूडमध्ये अजय देवगणच्या शतकीय कलाकृती असलेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवत तब्बल २०० कोटींपेक्षा जास्तची कमाई करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली मोहोर उमटवली आहे. अजय देवगण आता स्कोर ट्रेंड इंडियाच्या लोकप्रियतेच्या चार्टवरही नंबर एकवर विराजमान झाला आहे.

अजयने लोकप्रियतेच्या बाबतीत सुपरस्टार रजनीकांत यांनाही पछाडले आहे. अजय देवगणच्या लोकप्रियतेत जानेवारी महिन्यात ‘तान्हाजी’ चित्रपटामुळे चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात अजयने तान्हाजी चित्रपटाच्या प्रमोशनच्यामुळे लोकप्रियतेत चौथे स्थान मिळवले होते. पण, चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होताच अजय देवगणच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाल्यामुळे अजय अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘दरबार’ चित्रपटही ‘तान्हाजी’ चित्रपटासोबत रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे रजनीकांत यांच्याही लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून येत आहे. आपल्या चित्रपटाच्या रिलीजवेळी साऊथ सुपरस्टार रजनीकांत सातव्या स्थानावर होते. तर चित्रपटाच्या रिलीजनंतर ते सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचले आहेत.

लोकप्रियतेत बॉलीवूडच्या ३ महारथींनी सुपरस्टार रजनीकांत यांना चांगलीच टक्कर दिली आहे. लोकप्रियतेत सलमान खान, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या बॉलीवूडच्या तीन सुपरस्टार्सनी रजनीकांत यांना मागे टाकले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

या आकडेवारीनूसार, डिजिटल न्यूज (सोशल प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट), व्हायरल न्यूज आणि न्यूजप्रिंटवर अजय देवगन ९५.९८ गुणांसह प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. तर सलमान खान ७५.२४ गुण पटकावून दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम त्यामध्ये होणाऱ्या वाद विवादांमूळे चर्चेत असतो.

हिंदी सिनसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन ४९.५३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. तर ब्लॉकबस्टर ‘कुमार’ म्हणून ओळखला जाणारा अक्षयकुमार आपल्या ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या यशामुळे बॉक्स ऑफिससोबतच लोकप्रियतेतही पुढे आहे. ३१.९८ गुणांसह अक्षय चौथ्या स्थानावर आहे. लिव्हिंग लिजेंड रजनीकांत २६.१७ गुणांसह लोकप्रियतेत पाचव्या स्थानावर आहेत.

Leave a Comment