यशोगाथा : दररोज 5 तास अभ्यास करत कंडक्टर उत्तीर्ण झाला यूपीएससीची परिक्षा

जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही जगातील कोणत्याही गोष्टीला मात देऊ शकता. असेच काहीसे बसमध्ये कंडक्टर असलेल्या मधू एनसीने करून दाखवले आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर मधूने स्वतःला काय हवे आहे ते मिळवले आहे. आज याच मेहनतीमुळे तो चर्चेचा विषय ठरत आहे.

दररोज बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करताना वेळ काढून तो 5 तास अभ्यास करायचा व आज मेहनतीच्या जोरावर त्यांनी लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) मुख्य परिक्षा पास केली आहे. 25 मार्चला त्याची मुलाखत होणार आहे. ही मुलाखत पास झाल्यावर मधून आयएएस अथवा आयपीएस ऑफिसर होईल.

मधू बंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये बसचा कंडक्टर आहे. तो 29 वर्षांचा असून, त्याने मागील वर्षी जूनमध्ये पुर्व परिक्षा दिली होती. ही परिक्षा पास झाल्यानंतर त्याने ऑक्टोंबरमध्ये मुख्य परिक्षा दिली व यात देखील यश मिळवले.

तो कर्नाटकच्या मंड्या येथील एक छोटेसे गाव मालवल्ली येथून आहे. 19 वर्षांचा असताना त्यांने शाळा संपल्यानंतर कंडक्टर म्हणून काम सुरू केले. नोकरीसोबतच त्याने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले. त्याने पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे.

मधू सांगतो की, माझ्या आई-वडिलांना माहिती नाही की मी कोणत्या परिक्षेत पास झालो आहे. मात्र ते खूष आहेत. माझ्या कुटुंबात शिक्षण घेणारा मी पहिला व्यक्ती आहे.

मधू दररोज 8 तास कंडक्टर म्हणून काम करतो. तो सांगतो की, ही एक दमवून टाकणारी नोकरी आहे. खूप मेहनत करावी लागते. तासंतास गर्दीने भरलेल्या बसमध्ये तिकिट काढावे लागते. मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी सोडून सध्याचे बॉस सी शिखा (बीएमटीसी मॅनेजिंग डायरेक्टर) यांच्याप्रमाणे आयएएस अधिकारी बनायचे आहे.

त्याने सांगितले की, शिखा दररोज 2 तास मुलाखतीसाठी मार्गदर्शन करतात. त्यांनी नेहमीच मला मदत केली. यूपीएससी आधी मधूने 2014 मध्ये कर्नाटक प्रशासकीय सेवा व 2018 मध्ये यूपीएससीची परिक्षा दिली होती. मात्र त्यात त्याला यश मिळाले नव्हते.

यश मिळाले नाही म्हणून निराश न होता, त्याने अधिक मेहनत घेतली. दररोज काम करून 5 तास अभ्यास केला. रोज सकाळी 4 वाजता उठून अभ्यास करून तो कामाला जातो. त्याने कोचिंग सेंटरला जाण्याऐवजी आपले वरिष्ठ सहकारी आणि इंटरनेटची मदत घेतली व अखेर त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले.

Leave a Comment