पाताळकोट – अज्ञात, अजब ठिकाण


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
पृथ्वीच्या खाली कुठेतरी पाताळलोक आहे असा विश्वास अनेकांना वाटतो आणि हिंदू धर्मग्रंथातून पाताळ लोकाचे अनेक संदर्भ, कथा, कहाण्या सांगितल्या गेल्या आहेत. भारताच्या मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात अशी एक जागा आहे तिचे नाव आहे पाताळकोट. ही एक प्रचंड मोठी म्हणजे सुमारे ९० चौरस किलोमीटरची दरी असून या ठिकाणी जमिनीखाली १७०० फुट खोलीवर १२ गावे आहेत. बाहेरच्या जगापासून आजही अलिप्त असलेले हे ठिकाण प्रामुख्याने आदिवासी लोकांचे निवासस्थान आहे. या भागातील अनेक गावात जाणे आजही अतिशय अवघड असून सुधारणेचे वारे या गावातून अजूनही पोहोचलेले नाहीत.


प्रचंड उंचीच्या विशालकाय सातपुडा पर्वत रांगांनी वेढलेली ही भूमी. अगदी निसर्गसंपन्न. आजही येथे सूर्य किरणे उशिरा आणि अगदी थोडावेळ प्रकाशतात. पावसाळ्यात पूर्ण दरी ढगांनी व्यापलेली असते. जणू ढग या दरीत तरंगतात. ही एक वेगळीच दुनिया भासते. पौराणिक कथेनुसार रावणपुत्र मेघनाद याने येथेच शिव उपासना केली आणि याच मार्गाने तो पाताळ लोकात गेला. त्यामुळे या जागेला पाताळात जाण्याचा दरवाजा असेही म्हटले जाते.


भरिया गोंड आणि आदिवासी येथील रहिवासी. ते पूर्णपणे निसर्गाशी जोडलेले. या भागाबाबत अनेक दंतकथा आहेत. नुकतीच या भागात विकास कामे सुरु झाली आहेत. २००७ साली येथे पहिली आंगणवाडी सुरु झाली. गलदुब्बा या गावापर्यंत पक्का रस्ता झाला आहे. येथे शेती हाच परंपरागत व्यवसाय असून कुपोषणाची समस्या गंभीर आहे. डोंगरावरून येणारे पाणी हाच एकमेव पाण्याचा स्रोत. पूर्वी हे झरे वर्षभर वाहते असत पण आता हवामान बदलाचा फटका या भागालाही बसला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात हे झरे आटतात. येथील जैवविविधता धोक्यात आली असून या भागात सापडण्याऱ्या दुर्लभ जडीबुडी नष्ट होत चालल्या आहेत.

घोड्याच्या आकाराच्या या दरीतून दुधी नदी वाहते. या भागातील खडक २५०० दशलक्ष वर्षे जुने आहेत असे सांगतात. ग्रेनाईट या भागात सापडते.

Leave a Comment