वर्क फ्रॉम होम मुळे वाढताहेत समस्या - Majha Paper

वर्क फ्रॉम होम मुळे वाढताहेत समस्या


आज काल अनेक कंपन्यात वर्क फ्रॉम होम कल्चर वाढताना दिसते आहे. या कल्चर मुळे घर बसल्या काम, कामाचे फ्लेक्झिबल तास, प्रवासाचा वाचणारा वेळ, घरी राहिल्याचे समाधान असे अनेक प्रकारचे फायदे होत असल्याचे सांगितले जात असले तरी नवीन संशोधन मात्र वेगळेच काही सांगते आहे. वर्क फ्रॉम होम कल्चरच्या फायद्यापेक्षा त्याचे तोटे अधिक असल्याचे हा अहवाल सांगतो.

आरोग्यविमा क्षेत्रातील कंपनी सिग्नाने या संदर्भात अहवाल सादर केला आहे. त्यानुसार वर्क फ्रॉम होम करणारया लोकांमध्ये एकटेपणा वाढतो आहे. २०१९ मध्ये झालेल्या सर्व्हेक्षणात ६१ टक्के लोकांनी एकटे वाटत असल्याची तक्रार केली आहे. अमेरिकी जीवनात माणूस साधारण ९० हजार तास कामात असतो. सिग्नाचे सीईओ डेव्हिड कोर्दान या संदर्भात म्हणाले, आजकाल काम करताना तंत्रज्ञान खूप वापरले जाते. दूरसंचार आणि सततचे काम यामुळे तणाव वाढत आहेत. लोकांना आरामासाठी वेळ नाही.


वर्क फ्रॉम होम करणारे तसेही ऑफिस कलिगपासून दूर राहतात. घरात काम नसले की एकटेपणा येतो. संवादाची गरज भागत नाही परिणामी हे लोक सोशल मीडियाचा प्रचंड वापर करतात. त्यामानाने दोस्त, कुटुंब याना वेळ देत नाहीत. युवक वर्गात वर्क फ्रॉम होम करणारे ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांच्या तुलनेत एकटे पडतात. त्यात १८ ते २८ वयोगटातील युवकांचे प्रमाण मोठे आहे. या वयोगटातील ७३ टक्के युवकांना एकटेपणा जाणवतो आहे. त्यांना जवळचे दोस्त राहत नाहीत. हा ट्रेंड सगळीकडेच दिसतो आहे मग ते अगदी उच्च पदावर काम करणारे असोत वा खालच्या पदावर काम करणारे असोत. विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांना एकटे वाटण्याचे प्रमाण कमी आहे. एकटे वाटणाऱ्या पुरुषांचे प्रमाण ४० टक्के आहे तर महिलांच्यात हे प्रमाण २९ टक्के आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment