टीम इंडिया बस मधली धोनीची कॉर्नर सीट रिकामीच


फोटो सौजन्य टीव्ही ६ भारतवर्ष
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी उर्फ माहीची संघातील जागा कोण घेणार आणि धोनीच्या जागी कोण फिट बसेल याची चर्चा जोरात होत असली तरी धोनीची एक जागा मात्र अजूनही रिकामी राखली गेली आहे. ही जागा आहे टीम इंडियाच्या बस मधली कॉर्नर सीट. भारतीय स्पिनर यजुवेंद्र चहल याने शूट केलेला एक व्हिडीओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकौंटवर शेअर केला आहे त्यात ही बाब स्पष्ट झाली आहे.

या व्हिडीओ मध्ये टीम इंडिया, बसमधून ऑककंड येथून हेमिल्टन येथे जाताना दिसत आहे. ऑकलंड मध्ये भारताने न्यूझीलंड विरुद्धच्या सिरीज मध्ये सुरवातीचे दोन्ही टी २० सामने जिंकले असून आता हेमिल्टन येथे सामना होत आहे. या प्रवासात चहलने काढलेल्या व्हिडीओ मध्ये अगदी शेवटी कॅमेरा त्या सीटपर्यंत पोहोचतो, ज्या सीटवर धोनी नेहमी बसत असे. सीट कडे बोट दाखवून चहल म्हणतो, ही सीट एका लीजंटची आहे. माहीभाई, अजून येथे कुणी बसत नाही. आम्ही माहीला फार मिस करतोय.

गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये धोनी इंग्लंड मध्ये आयसीसी वर्ल्ड कप मध्ये खेळला होता त्यानंतर तो पुन्हा क्रिकेट मैदानावर दिसलेला नाही.

Leave a Comment