राष्ट्रवादी काँग्रेसने बदलला देशाचा नकाशा


मुंबई – मोठ्या उत्साहात रविवारी देशभरात ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळाडू, कलाकार, राजकीय नेते, पक्ष आणि विविध मान्यवरांनी देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण, या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना चूक झाल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून फेसबुक, ट्विटरवर आणि इतर सोशल मीडियावरून देशवासीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या, पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुभेच्छा देताना सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या छायाचित्रामध्ये देशाचा चुकीचा नकाशा वापरण्यात आला. देशाच्या अधिकृत नकाशा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चुकीचा नकाशा प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाखची सीमारेषा चुकली असून, पाकव्याप्त काश्मीर तसेच अक्साई चीन हे भाग दाखवण्यात आले नाहीत.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादीने भारताचा नकाशा पोस्ट केला आहे. ज्यात खांद्यावर तिरंगा घेऊन साहसी कौशल्य दाखवणाऱ्या जवानांचा फोटो दिसत आहेत. लोकशाहीचा उद्घोष करणारे भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो ! सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.

Leave a Comment