आमिरसाठी अक्षयने बदलली ‘बच्चन पांडे’ची रिलीज डेट


सध्या आपल्या बहुचर्चित आगामी ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा व्यस्त आहे. हा चित्रपट यावर्षी नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. पण, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट देखील याच महिन्यात रिलीज होणार होता. त्यामुळे आमिर खानच्या विनंतीवरुन या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.


नोव्हेंबर महिन्यात ‘बच्चन पांडे’ आणि ‘लाल सिंग चढ्ढा’ हे दोन्ही चित्रपट रिलीज होणार आहेत. पण, दोन बिग बजेट चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले तर दोन्ही चित्रपटाच्या व्यवसायावर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे आमिर खानने ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे निर्माते आणि अक्षय कुमार यांच्याशी संवाद साधुन ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाची तारीख बदलण्याची विनंती केली. आमिर खानने अक्षय कुमारच्या चित्रपटाची तारीख बदलल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षयचे आभार मानले आहेत. तसेच त्याच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटानंतर बऱ्याच दिवसांनी आमिर खान ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात करिना कपूर खानचीही भूमिका पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा रिमेक आहे. या चित्रपटाचे अद्वेत चंदन हे दिग्दर्शन करत आहेत. तर, आमिर खान प्रॉडक्शन आणि व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

Leave a Comment