प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी करा ‘ या ‘ अन्नपदार्थांचा आपल्या आहारात समावेश


दरवर्षी प्रमाणे यंदाही भारताची राजधानी दिल्ली येथे वायूप्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या बद्दलच्या बातम्या सतत टीव्ही, वर्तमानपत्रे इत्यादींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. या प्रदूषणामुळे दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये भयानक धुके पसरले आहे. दिल्ली मध्ये घराबाहेर पडताना लोक मास्क्स चा वापर करत आहेत, तर लहानग्यांच्या शाळांना तर सुट्टी देण्यात आली आहे. दिल्लीमध्ये प्रदूषणाची ही गत असतानाच, भारतातील बाकीची शहरे ही प्रदूषणापासून मुक्त नाहीत. अश्या हवेमुळे लोकांमध्ये श्वसनासंबंधी विकार, सतत सर्दी पडसे, निरनिराळ्या अॅलर्जी, डोळ्यांचे विकार इत्यादी तक्रारींचे वाढते प्रमाण दिसू लागले आहे. या समस्यांचे दुष्परिणाम जास्त करून मुले आणि वृद्धांमध्ये जास्त दिसत आहेत. अश्या वेळी आपल्या आरोग्याविषयी काळजी घेणे अगत्याचे आहे. आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी क जीवनसत्व, ओमेगा ३ फॅटी अॅसिड् असलेले अन्नपदार्थ, तसेच मध, आले, लसूण या अन्नपदार्थांचा समावेश अवश्य करायला हवा.

प्रदुषणामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल, किंवा सतत सर्दी पडसे होत असेल, तर एक लहान चमचा आल्याच्या रसामध्ये मध घालून दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे. तसेच मध आणि गुळ ह्याचे मिश्रण शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. त्यामुळे लहानसहान आजार आपल्यापासून लांब राहतील. जर सतत खोकला होऊन कफ साठत असेल, तर काळी मिरी कुटून मधात घालून सेवन करावी. ह्या उपायाने छातीमध्ये साठलेला कफ मोकळा होतो. त्याचप्रमाणे सर्दी आणि कफासाठी तुळस आणि दालचिनी घालून उकळलेले पाणी पिणे ही चांगले.

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लसूण अतिशय उपयोगी आहे. लसणी मध्ये असलेली अँटी बायोटिक तत्वे कफापासून आराम देतात. सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जर लसूण कच्ची खाणे शक्य नसेल, तर लसूण शिजवून घेऊन खावी, किंवा आपल्या रोजच्या भाजी आमटी मध्ये त्याचा आवर्जून समावेश करावा. लसूण सकाळी रिकाम्या पोटी खाणार असाल, तर लसूण खाल्ल्यानंतर पुढे अर्धा तास पाणी पिऊ नये.

आपल्या आहारामध्ये क जीवनसत्व असलेल्या अन्नपदार्थांचा समावेश करावा. आवळा, संत्रे, लिंबू, पेरू, या मध्ये क जीवनसत्व मुबलक मात्रेमध्ये असते. आवळा आणि अॅलो व्हेराच्या रसाचे नियमित सेवन केल्याने श्वसनासंबंधी विकार उद्भवत नाहीत. ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स असणारे अन्नपदार्थ ही आपल्या आहारात समाविष्ट करावेत. अक्रोड, शेंगदाणे, जवस, सुर्यफूल, मोहोरी, सोयाबीन, मोडविलेली कडधान्ये, टोफू, फ्लॉवर, शेंगभाज्या, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या या सर्व अन्नपदार्थांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स आहेत. मांसाहारी लोकांसाठी ट्युना, साल्मन इत्यादी माशांमध्ये ओमेगा ३ मुबलक प्रमाणात आहेत.

गाजर, टोमॅटो, आले, लसूण, मुळा इत्यादी भाज्यांच्या नियमित सेवनाने त्वचेचे आरोग्य चांगले राहील. तसेच शरीराचे सर्वसाधारण आरोग्य चांगले राखण्याकरिता मल्टीविटॅमिन्स युक्त पूरक औषधे घेणे ही उत्तम.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment