भरपूर वाचा, भरपूर जगा


वाचेल तो वाचेल ही मराठी म्हण असली तरी शास्त्रज्ञांनी केलेल्या ताज्या संशोधनाने या म्हणीवर शिक्कामोर्तब केले आहे. वाचनाची आवड असलेल्या व्यक्तींची दीर्घकाळ जगण्याची शक्यता जास्त असते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

अमेरिकेतील येल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आठवड्यातील सात तासांपेक्षा अधिक वाचन करणाऱ्या व्यक्तींचा मृत्यूदर हा वाचन न करणाऱ्या व्यक्तींपेक्षा 11 टक्क्यांनी कमी असतो.

या संशोधनासाठी 3700 पेक्षा अधिक व्यक्तींची माहिती गोळा करण्यात आली. मात्र पुस्तके वाचण्याने जो परिणाम होतो, तेवढा परिणाम वृत्तपत्र किंवा नियतकालिकांच्या वाचनाने होत नाही, असेही या पाहणीत आढळले आहे. वाचन केल्यामुळे मेंदूचे विविध भाग सक्रिय राहतात आणि ओळखण्याच्या क्षमता कायम राहतात, त्यामुळे हा परिणाम दिसून येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वाचन न करणाऱ्यांपैकी 28 टक्के लोकांमध्ये नैराश्याची लक्षणे दिसून आल्याचेही या संशोधनात दिसले. तसेच, वाचन करणाऱ्यांपैकी 20 टक्के लोकांनी एकटेपणा जाणवत नसल्याचेही सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment