आईसोबत बांगड्या विकून आयएएस झाला ‘हा’ तरुण


तुमचा निश्चय पक्का असेल तर परिस्थितीशी झगडून त्यावर मात करण्यासाठी येणाऱ्या कितीही अडचणी या शुल्लक वाटू लागतात. कारण आपल्या विचारात आणि प्रयत्नात परिस्थिती ही पूर्णपणे बदलण्याचा सामर्थ्य आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून आयएएस रमेश घोलप यांची कथा व्हायरल होत आहे. झारखंडच्या सरायकेला खरसावांचे उपायुक्त रमेश घोलप आहेत. आयएएसपर्यंतचा त्यांचा प्रवास हा अक्षरशः खडतर आणि प्रेरणादायी आहे.

२०१२ च्या बॅचचे रमेश घोलप आयएएस अधिकारी असून, ते सरायकेला जिल्ह्याचे उपायुक्त आहेत. ते याआधी खुंटीमध्ये एसडीएम म्हणून कार्यरत होते. रमेश यांनी आपल्या कार्यकुशलतेने प्रत्येक ठिकाणी आपली एक अविट छाप सोडली आहे. केवळ मनमिळावू अधिकारी नसून, लोकांचे दुःख जाणून घेऊन ते दूर करण्यासाठी रमेश प्रयत्नदेखील करतात, असे लोक म्हणत असल्यामुळेच ते लोकांमध्ये पेन्शन मिळवून देणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत.

रमेश घोलप यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील महागावमध्ये झाला. अतिशय दारिद्र्यात रमेश यांचे आयुष्य गेले. त्यांचे वडील गोरख घोलप यांचे सायकलचे दुकान होते. दारूचे प्रचंड व्यसन असलेल्या त्यांच्या वडिलांची सर्व कमाई दारू पिण्यातच वाया जात होती. वडिलांच्या अशा वागण्याने चार जणांच्या कुटुंबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांची आई विमल घोलप यांच्यावर आली. व्यसनग्रस्त वडिलांचे गरिबी आणि योग्य उपचार करण्याच्या क्षमते अभावी काही दिवसांनी निधन झाले. आईने वडिलांच्या पश्चात काबाडकष्ट करून दोन मुलांचे पालनपोषण आणि शिक्षण केले. शारीरिक व्याधी असतानादेखील परिस्थितीची जाण असलेले रमेश हे बालवयात आईला कामात मदत करायचे. शेतात काम करणारी त्यांची आई बांगड्या विकण्याचा व्यवसायदेखील करत असे.

वडिलांच्या मृत्यूनंतर शिक्षणाचे महत्व समजून देत २००५ मध्ये आईने रमेशला १२वीच्या परीक्षेला पाठवले. तिने रमेशच्या बालमनावर परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणाला पर्याय नसल्याचे बिंबविले. त्याला शिक्षकांनीदेखील समजावून सांगितले. रमेशने खूप अभ्यास करून बारावीच्या परीक्षेत ८८.५ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. नंतर २००९ मध्ये शिक्षण पूर्ण करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. पण त्यांचे ध्येय निराळेच होते. २०१० मध्ये नोकरीतून सहा महिन्यांची सुट्टी घेऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या रमेश यांनी यूपीएससीची परीक्षा दिली. पण अपयशाचा सामना त्यांना करावा लागला. त्यांना गावातील काही लोकांकडून पैसे जमा करून आईने पुन्हा अभ्यासासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर पुण्यात राहून त्यांनी खूप अभ्यास केला. त्यांनी २०१२ मध्ये यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवून २८७ वे स्थान प्राप्त केले.

Leave a Comment