असे वापरता येते हायड्रोजन पेरॉक्साईड


आपण घरामध्ये ठेवत असलेल्या किंवा एखाद्या दवाखान्यातील प्रथमोपचार देण्याच्या साहित्यामध्ये आपण हायड्रोजन पेरॉक्साईड हे रसायन नेहमीच पाहतो. आपल्याला हे देखील ठाऊक असेल, की किंचितसे हायड्रोजन पेरॉक्साईड जखमेवर घातल्याने जखमेतून थोडासा फेस बाहेर येऊन जखम स्वच्छ होते. हायड्रोजन पेरॉक्साईड मुळे जखम निर्जंतुक होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त ही हायड्रोजन पेरॉक्साईड चा इतर अनेक प्रकारे उपयोग करता येतो.

कानांमध्ये जर खूप मळ साठला असेल आणि तो सहजी निघत नसेल, तर कानामध्ये कुठल्याही प्रकारची वस्तू न घालता, हायड्रोजन पेरॉक्साईड चे दोन दोन थेंब टाकावेत. त्याने कानामधील मळ सहज बाहेर येईल. आपण बाजारामधून आणलेल्या भाज्यांवर कोणकोणती कीटकनाशके असतात, याची आपल्याला कल्पना नसते. तसेच काही कीटकनाशके अशी असतात, की ती नुसत्या पाण्याने धुवून निघत नाहीत. त्यामुळे भाज्या, एक कप पाणी व त्यामध्ये पाव कप हायड्रोजन पेरॉक्साईड या मिश्रणात अर्धा तास बुडवून ठेवाव्यात. त्यामुळे भाज्यांवरील कीटकनाशकांचा प्रभाव नाहीसा होईल.

जर तुम्ही घरामध्ये ह्युमिडीफायर वापरत असाल, तर त्या पाण्यामध्ये थोडेसे हायड्रोजन पेरॉक्साईड मिसळा. ह्युमिडीफायर मधून दिल्या जाणाऱ्या हायड्रोजन पेरॉक्साईड युक्त हवेमुळे , आपल्या आसपास च्या हवेमधील किटाणू नष्ट होऊन हवा शुध्द होण्यास मदत होईल. तसेच आपण वापरलेले टूथब्रश ही अधून मधून स्वच्छ करणे अतिशय आवश्यक असते. त्याने टूथब्रश मध्ये वाढणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. टूथब्रश स्वच्छ करण्यासाठी थोड्याश्या पाण्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड घालून टूथब्रश त्यामध्ये रात्रभर बुडवून ठेवावेत.

काही व्यक्तींच्या पायांना सतत बूट घातल्याने इन्फेक्शन होते, त्याला ही हायड्रोजन पेरॉक्साईड आणि पाण्याचे मिश्रण लावल्यास इन्फेक्शन बरे होते. तसेच पायाला ‘ कॉर्न ‘ आल्यासही या मिश्रणाचा वापर करावा. जर अंगावर घामोळी किंवा काही कारणाने बारीक पुरळ उठत असेल, तर थोड्या पाण्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड घालून त्या पाण्याने पुरळ किंवा घामोळी पुसून काढावीत. हा उपाय काही दिवस केल्याने पुरळ किंवा घामोळी नाहीशी होतील. तसेच थोडेसे हायड्रोजन पेरॉक्साईड घातलेल्या पाण्याने चेहरा दररोज पुसून काढल्यास चेहऱ्यावरील मुरुमे नाहीशी होण्यास मदत मिळेल.

अचानक दातदुखी सुरु झाल्यास थोड्याश्या खोबरेल तेलामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड मिसळून त्या मिश्रणाने गुळण्या केल्यास दातदुखी कमी होते. तसेच लहान सहान जखमा, हायड्रोजन पेरॉक्साईड ने निर्जंतुक केल्याने त्यामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता रहात नाही, व जखमा लवकर भरून येतात. रोज दात घासल्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईड मिसळलेल्या पाण्याने चुळा भरल्यास दात शुभ्र होतीलच, शिवाय श्वासाची दुर्गंधी देखील नाहीशी होईल.

हायड्रोजन पेरॉक्साईड घरामध्ये फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मिसळल्यास फरशी निर्जंतुक होण्यास मदत मिळते. तसेच आपण बाजारातून सामान आणण्यासाठी वापरत असलेल्या पिशव्या, शाळेमध्ये किंवा ऑफिस मध्ये जेवण घेऊन जाण्यासाठी वापरात असलेले डबे स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यासाठीही हायड्रोजन पेरॉक्साईड चा वापर करावा. आपण वापरात असलेल्या कॉन्टॅक्ट लेन्सेस ची स्वच्छता करताना ही हायड्रोजन पेरॉक्साईड चा वापर जरूर करावा.

Leave a Comment