रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे


सर्वसाधारणपणे लसणीचा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी, एखाद्या भाजीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी, किंवा चटण्या बनविण्यासाठी केला जातो. एखादी बेचव भाजी केवळ लसूण त्यामध्ये घातल्याने किती चविष्ट बनते ! पण केवळ खाद्यपदार्थांची चव वाढविण्याखेरीज ही लसूण अजून किती तरी प्रकारे उपयोगाला येते. लसणीमध्ये अशी अनेक गुणकारी तत्वे आहेत, ज्यामुळे आपला अनेक विकारांपासून बचाव होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये लसणीला ‘ वंडर फूड ‘ म्हटले गेले असून, लसणीचा उपयोग औषधी म्हणून केला गेला आहे. त्यामुळे आपण आपल्या आहारात लसणीचा समावेश करणे अगत्याचे आहे. पण या औषधीचा सर्वात जास्त उपयोग सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खाल्ल्याने होतो. त्यामुळे दररोज सकाळी उठल्यानंतर एक लसणीची पाकळी चावून खावी व त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावे. जर लसूण चावून खाणे शक्य नसेल, तर लसणीची पाकळी गरम पाण्याबरोबर गिळून टाकावी.

लसूण हृदयरोगाशी संबंधित तक्रारी दूर करण्यास मदत करते. लसूण खाल्ल्याने रक्ताच्या गाठी बनत नाहीत ( clotting ). तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही कमी होते. लसूण आणि मध मिसळून खाल्ल्यास हृदयाच्या धमन्यांमध्ये असलेले ब्लॉकेज दूर होते, त्यामुळे हृदयाचा रक्तप्रवाह सुरळीत सुरु राहतो. लसूण खाल्ल्याने उच्चरक्तदाब असल्यास तो नियंत्रित ठेवणे शक्य होते. लसणीच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते.

डायरिया किंवा बद्धकोष्ठ या पोटाच्या दोन्ही विकारांमध्ये लसूण उपयोगी आहे. यासाठी थोडे पाणी उकळायला ठेऊन त्यामध्ये पाच-सहा लसणीच्या पाकळ्या घालाव्यात. पाणी साधारण सात-आठ मिनिटे उकळून घ्यावे. त्यांनतर हे पाणी थोडे निवले, की मग हे पाणी प्यावे. या लसणीच्या पाण्यामुळे जुलाब आणि बद्धकोष्ठ या दोन्ही विकारांमध्ये आराम मिळतो. तसेच शरीरामधील घातक पदार्थ देखील लसणीच्या पाण्याच्या सेवनाने बाहेर टाकले जातात. तसेच लसणीच्या सेवनाने पाचनशक्ती देखील चांगली राहते. ज्यांना अपचनाचा त्रास होत असेल, किंवा ज्यांना काही कारणाने भूक कमी लागत असेल, त्यांनी सकाळी रिकम्या पोटी लसूण चावून खावी. लसणीचा सेवनाने अॅसिडीटीपासून ही आराम मिळतो.

लसणीमध्ये अँटी बॅक्टेरियल व वेदना कमी करणारी तत्वे आहेत. त्यामुळे इन्फेक्शन झाल्याने जर दातदुखी सतावत असेल, तर लसणीची एक पाकळी ठेचून जो दात दुखत असेल, तिथे ठेवावी. या उपायाने दात दुखी कमी होण्यास मदत होते. श्वासनाशी संबंधित विकारांमध्ये ही लसणीच्या सेवनाने फायदा होतो. सर्दी-पडसे, खोकला, अस्थमा, निमोनिया, ब्रॉन्कायटीस, इत्यादी विकारांमध्ये लसणीचे सेवन फायदेशीर ठरते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment