हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी नव्या पद्धतीचा विकास


भारताची राजधानी दिल्ली येथे असलेल्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे वैद्यकीय चिकित्सक डॉक्टर मनीष कुमार गुप्ता यांनी हर्नियाची शस्त्रक्रिया करण्याची नवीन पद्धत विकसित केली आहे. ही पद्धत कमी खर्चाची असून, एका लहानश्या ‘ कट ‘ ने ही शस्त्रक्रिया पार पाडता येणे शक्य होणार आहे. या नवीन पद्धतीने आत्तापर्यंत सुमारे शंभर रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टर मनीष कुमार यांनी या नवीन पद्धतीने केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेला ‘ ५५५ मनीष टेक्निक ‘ असे नाव दिले आहे. काही वर्षांपूर्वी हर्नियाची ‘ ओपन सर्जरी ‘ होत असे. त्यानंतर ‘ लॅप्रोस्कोपी ‘ हे तंत्रज्ञान अस्तित्वात आले. या तंत्रज्ञानामध्ये दुर्बिणीचा वापर करून शस्त्रक्रिया होत असे. या साठी नाभीच्या खाली २ सेंटीमीटर लांबीचा ‘ कट ‘ दिला जात असे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कट जितका जास्त मोठा, तितका त्यामध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक, आणि तितक्याच अधिक रुग्णाला वेदना देखील.

डॉक्टर मनीष यांनी विकसित केलेल्या नवीन पद्धतीमध्ये शस्त्रक्रियेसाठी रुग्णाच्या शरीरावरदिला जाणारा कट केवळ ५ मिलीमीटर लांबीचा आहे. त्यामुळे पोटाच्या लायनिंग मध्ये अतिरिक्त टाक्यांची गरज पडत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच हा कट अतिशय लहान असल्यामुळे तो लवकर भरून येतोच, शिवाय त्यामध्ये इन्फेक्शन होण्याची संभावनाही कमी असते. डॉक्टर मनीष यांनी विकसित केलेली हर्नियाच्या शस्त्रक्रियेची नवीन पद्धत आता देशभरामधेच नाही, तर जगभरामध्ये वापरली जात आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment