ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर


मुंबई: आपल्या देशाचा अतिशय मानाचा असा पद्मश्री पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. सुरेश वाडकर यांचा बहुमान या पुरस्कारामुळे आणखी वाढला आहे. केंद्र सरकारकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते. त्याप्रमाणेच यंदा देखील या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

सुरेश वाडकरांनी गेली अनेक वर्ष अभिजात संगीताच्या माध्यमातून श्रोत्यांच्या मनावर गारुड घातले आहे. त्यांनी अनेक मराठी गाण्यांसोबतच बॉलिवूडमधील बरीच हिंदी गाणी देखील गायली आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्काराने २००७ साली सुरेश वाडकर यांना सन्मानित करण्यात आल्यानंतर पद्म पुरस्कार त्यांना मिळेल अशी अनेकांना आशा होती. पण पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांना अनेक वर्ष वाट पाहावी लागली. यंदा हा पुरस्कार अखेर त्यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराच्या घोषणेनंतर त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर यावेळी त्यांनी मंगेशकर कुटुंबीयांचे देखील आभार मानले. बरच काही लता दीदी, आशा ताई आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्यामुळे शिकता आल्याचेही यावेळी सुरेश वाडकर म्हणाले.

वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरेश वाडकर यांनी संगीताच्या शिक्षणाला सुरुवात केली होती. सुरेश वाडकर यांनी पार्श्वगायक म्हणून ‘गमन’ चित्रपटातून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी यावेळी गायलेले ‘सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है’ हे गाणे प्रचंड गाजल्यानंतर त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. भारतरत्न लता मंगेशकर यांनी सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार मिळावी यासाठी राष्ट्रपतींना अनेकदा पत्रेही लिहिल्याचे स्वत: सुरेश वाडकर यांनीच सांगितले आहे.

Leave a Comment