‘हे‘ अन्नपदार्थ वारंवार गरम करून खाणे धोक्याचे


आपण तयार केलेले खाद्यपदार्थ खाण्याच्या वेळेपर्यंत गार होऊन गेले, की आपण ते परत गरम करतो. किंवा केलेले अन्नपदार्थ जर शिल्लक राहिले, तर ते फ्रीजमध्ये ठेऊन आपण नंतर गरम करून खात असतो. कित्येक वेळेला उरलेल्या पदार्थांमध्ये अजून साहित्य घालून आपण त्यातून एक नवीनच पदार्थ तयार करतो. असे करताना एका गोष्टीचा आपण विचार करीत नाही, की अन्न असे वारंवार गरम करण्यामुळे अन्नामधील पोषक तत्वे नष्ट होतात. त्यामुळे पदार्थ एकदा करून ठेवला, की तो वारंवार गरम करत राहणे आवर्जून टाळायला हवे. आणि काही अन्नपदार्थ असे आहेत, की एकदा शिजविल्यानंतर ते जर परत परत गरम केले गेले, तर ते खाण्यास योग्य न राहता, आरोग्यास धोकादायक ठरू शकतात.

आजकालचे आयुष्य धावपळीचे झाल्याने कामे फार आणि वेळ कमी अशी अवस्था सर्वांचीच झाली आहे. त्यातून दिवसभर कामानिमित्ताने घराबाहेर राहावे लागत असलेल्या कित्येक महिलांना दोन दिवसांचा स्वयंपाक एकदमच करून ठेवण्याचा पर्याय सोपा वाटतो, कारण त्यामुळे वेळ वाचतो, आणि धावपळ वाचते. मग हे पदार्थ फ्रीज मध्ये ठेवले, की घरातील प्रत्येक जण आपापल्या सोयीने अन्न गरम करून घेत असतो. पण आपण बनवित असलेले काही अन्नपदार्थ वारंवार गरम केल्यास ते अन्नपदार्थ आपल्या शरीराला नुकसानकारक ठरू शकतात.

मशरूम्स घालून केलेला कोणताही पदार्थ शक्यतो केल्यावर लगेचच खाऊन संपविणे योग्य असते. पण जर मशरूम्स ची भाजी उरलीच, तर ती परत गरम करून खाणे टाळावे. पुन्हा गरम केलेल्या मशरूम्सच्या भाजीमुळे पोट बिघडण्याची शक्यता असते. अंडे हे ‘ सुपरफूड ‘ म्हणून ओळखले जात असले, तरी अंड्यापासून बनविलेले अन्नपदार्थ ही त्वरित खाऊन संपविणे योग्य. उकडलेली अंडी, अंड्याचे ऑमलेट, अंडा करी इत्यादी अंड्यापासून बनविलेले पदार्थ पुन्हा गरम करून खाल्ल्यास त्याद्वारे फूड पॉयझनिंग चा धोका उद्भवू शकतो. दुसऱ्यांदा गरम करून खाल्लेले अंड्याचे पदार्थ पचनक्रिया बिघडवू शकतात.

बटाट्याची भाजी आपल्या पैकी जवळजवळ सर्वांनाच आवडते. ही भाजी करताना बटाटे उकडून घेतल्यानंतर ते गार झाल्यानंतरच त्याची भाजी करण्याची पद्धत आहे. पण उकडलेले बटाटे निवण्याकरिता ओट्यावरच ठेवले असता, त्यांच्या मध्ये ‘ बोटूलिझम ‘ नावचे बॅक्टेरिया तयार होत असतात. एकदा तयार केलेली बटाट्याची भाजी खाण्यापूर्वी परत गरम केल्याने देखील हे बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत. त्यामुळे बटाटे शिजवून घेतल्यानंतर गार करण्यासाठी बाहेर न ठेवता, फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवावेत.

रेफ्रिजरेट केलेले चिकन जर परत गरम केले गेले, तर त्यामधील प्रथिनांचे कॉम्पोझिशन पूर्णपणे बदलू शकते. तसेच चिकन घालून तयार केलेला अन्नपदार्थ परत परत गरम करून खाल्ल्याने पोट ही खराब होऊ शकते. तसेच चिकनचा अन्नपदार्थ तयार करताना चिकन व्यवस्थित शिजले आहे किंवा नाही याकडे आवर्जून लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे भात शिजविल्यानंतर जेवण झाल्यानंतर ही शिल्लक राहिला असेल, तर तो फ्रीज मध्ये घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवावा. कच्च्या तांदळात जे जीवाणू असतात, ते भात शिजविल्यानंतरही त्यात राहतात. जर शिजवलेला भात उरला आणि तो तसाच ओट्यावरच झाकून ठेवला, तर रूम टेम्परेचर वर ह्या भातातील जीवाणूंचे परिवर्तन बॅक्टेरिया मध्ये होते. हा भात खाल्ल्यानंतर उलट्या किंवा जुलाब होण्याचा धोका संभवतो.

पालक किंवा इतर पालेभाज्यांमध्ये नायट्रेट हे तत्व मोठ्या प्रमाणावर असते. परत परत गरम केल्याने या भाज्यांमधील नायट्रेट आरोग्यास धोकादायक ठरू शकते. तसेच बीट मधेही मोठ्या प्रमाणावर नायट्रेट असते. त्यामुळ शिजविलेले बीट जर परत गरम करून खाल्ले तर पोटदुखी उद्भवू शकते. आता प्रश्न असा की अन्नपदार्थ जर परत परत गरम करून खाल्ल्याने ते आरोग्यास धोकादायक ठरत असतील, तर उरलेले अन्नपदार्थ वाया जाऊ देणे योग्य आहे का? मुळातच आपण जेवढे अन्न आवश्यक आहे, तेवढेच शिजविले, आणि शिजविलेल्या अन्नाचे त्वरित सेवन केले, तर हा प्रश्न उद्भविणारच नाही. त्यातून अन्न उरलेच तर ते योग्य पद्धतीने स्टोर करणे ही महत्वाचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment