कॅनडाने जगाला दिल्या ‘या’ वस्तू


इतर देशांच्या मानाने कॅनडा हा ‘ तरुण देश ‘ समजला जातो. हा देश अस्तित्वात येऊन आता कुठे दीडशे वर्षांचा काळ लोटला आहे. पण तरी ही या देशाने इतर जगाला अश्या अनेक वस्तू दिल्या, ज्या इतर जगाने नुसत्या स्वीकारल्याच नाहीत, तर आपल्याश्या ही करून घेऊन त्यांचा वापर आजतागायत चालू ठेवला. आईस हॉकी हा कॅनडामध्ये जन्माला आलेला खेळ तेथील थंडीच्या ऋतूमधील राष्ट्रीय खेळ समजला जात असला, तरी बास्केटबॉल या खेळाचा जन्म ही कॅनडामध्ये झाला आहे. ओंटारियोमध्ये बालपण गेलेल्या आणि मॅकगिल विद्यापीठामध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टर जेम्स नाईस्मिथ हे या खेळाचे शोधकर्ता आहेत. १८९१ साली डॉक्टर नाईस्मिथ यांच्या वरिष्ठांनी त्यांना असा खेळ शोधून काढण्यास सांगितले, जो हिवाळ्यामध्ये ही संकुलाच्या आत खेळता येऊन क्रीडापटूंना भरपूर शारीरिक व्यायाम ही देणारा असेल. त्यावेळी डॉक्टर जेम्स यांनी फळांच्या मोठ्या टोपलीला खालून भोक पाडले आणि ती टोपली उंचावर टांगून ठेवली. या उंचावरच्या टोपलीमध्ये अचूक बॉल फेकण्यास त्यांनी क्रीडापटूंना सांगितले. हा बॉल कसा फेकला जावा या बद्दल त्यांनी तेरा वेगवेगळे नियम ही आखून दिले. आणि अश्या रीतीने बास्केटबॉलचा जन्म झाला. आता हा खेळ जगामध्ये जवळ जवळ सर्वच देशांमध्ये खेळला जातो.

ओंटारियो येथील वॉटरलूमध्ये राहणाऱ्या माईक लाझारीडीस आणि डग फ्रेगिन यांनी सुरु केलेल्या कंपनीमुळे स्मार्टफोन्सच्या क्रांतीस सुरुवात झाली. या जोडीने १९८४ साली ‘ ब्लॅक बेरी ‘ ची सुरुवात करून याच नावाचा पेजर १९९९ साली बाजारात आणला. त्यानंतर त्याच नावाने त्यांनी पहिला स्मार्टफोन २००२ साली बाजारात आणला. ह्या फोन ने थोड्याच अवधीत प्रसिद्धीचे शिखर गाठले. सुरुवातीच्या काळात फक्त मोठमोठ्या उद्योगपतींच्या हातामध्ये दिसणारा हा स्मार्टफोन लवकरच सर्वसामान्यांच्याही आटोक्यात आला. लाझारीडीस आणि फ्रेगिन यांच्या मुळे वॉटरलू हे जागतिक कीर्तीचे औद्यागिक क्षेत्र म्हणून नावारूपाला आले.

कॅनडाचे निवासी असणारे जॉन अलेक्झँडर ‘ जॅक ‘ हॉप्स यांना कॅनडाचे बायोमेडीकल इंजिनियरिंग क्षेत्राचे जनक समजले जाते. डॉक्टर विल्फ्रेड बिगलो आणि डॉक्टर जॉन कॅलॅहॅन यांच्या बरोबर संशोधन करीत जॉन हॉप्स यांनी जगातील पहिल्या कृत्रिम पेसमेकरची निर्मिती १९४९ साली केली. आता पेसमेकर हा सर्व जगामध्ये हृदयरोगाच्या अनेक उपचार पद्धतींपैकी एक निर्धोक उपचारपद्धत म्हणून सर्वमान्य आहे.

पिनट बटर, म्हणजेच शेंगदाण्यापासून तयार केले गेलेले लोण्यासारखे स्प्रेड ही कॅनडामधेच सर्वप्रथम तयार करण्यात आले. १८८४ साली मार्सेलस गिलमोर एडसन यांनी पीनट पेस्टचे पेटंट घेतले. त्यांनी ही पेस्ट भाजलेले शेंगदाणे दळून केली होती. त्यानंतर १८९५ साली डॉक्टर जॉन हार्वी केलॉग यांनी कच्च्या शेंगदाण्यांपासून पिनट बटर तयार करून त्याचे पेटंट मिळविले. त्यानंतरही पीनट बटरमध्ये अनेक परिवर्तने झाली, पण ती परिवर्तने घडवून आणणारी सर्व मंडळी कॅनडा निवासीच होती.

इन्सुलिन हे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या अमूल्य शोधांपैकी एक आहे. याचा शोधही कॅनडामधेच लागला. डायबीटीस सारख्या रोगावर नियंत्रण मिळविण्याकरिता पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन तयार होणे अत्यंत आवश्यक असते. पण ते तसे तयार होत नसल्याने रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढून मधुमेहासारखा आजार होतो. डॉक्टर फ्रेडरिक बँटिंग, चार्ल्स बेस्ट, जे बी कोलीप, आणि जे आर मॅकलिओड यांच्या टीम ने १९२२ साली इन्सुलिनचा आविष्कार केला. त्या करिता बँटिंग आणि मॅकलिओड यांना नोबेल पारितोषिकाने सम्मानित करण्यात आले.

Leave a Comment