पेप्टिक अल्सरची लक्षणे आणि उपाय


पेप्टिक अल्सर हे जरी एखाद्या भयंकर, असाध्य रोगाचे नाव वाटत असले, तरी हा विकार तितकासा असाध्य नाही. मानवी शरीरातील इसोफेगस ( अन्ननलिका ), पोट आणि लहान आतड्यांना काही कारणाने झालेल्या जखमांना पेप्टिक अल्सर म्हटले जाते. ह्या जखमा ( sores ) या अवयावांमधील पेशींचे काही कारणाने नुकसान झाल्याने किंवा पोटामधील अॅसिड्समुळे आतड्यांच्या लायनिंग चे नुकसान झाल्याने उद्भवतात. पेप्टिक अल्सर हा विकार सामान्य असून साधारणपणे साठीच्या वरील व्यक्तींमध्ये आढळतो. भारतामध्ये दरवर्षी सुमारे दहा मिलियन व्यक्तींना पेप्टिक अल्सर असल्याचे निदान करण्यात येते अशी माहिती एका वैद्यकीय जर्नल मध्ये नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. हा विकार पुरुष आणि स्त्रिया या दोहोंमध्ये उद्भवू शकतो. हा विकार असल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण जवळ जवळ नाहीच. ह्या आजाराचे निदान झाल्यानंतर योग्य वेळी घेतलेला वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार, हा विकार पूर्णपणे बरा करू शकतात.

आपल्या पोटामध्ये जी अॅसिड्स तयार होतात, त्यांच्या मदतीने अन्न पचण्यास मदत होते. पण ही अॅसिड्स जर अतिरिक्त प्रमाणात तयार होऊ लागली तर पचनक्रियेस सहायक होण्याऐवजी या अॅसिड्समुळे आतड्यांना नुकसान होऊ लागते. यामुळे आतड्यावर लहान लहान जखमा होतात. पेप्टिक अल्सर होण्याची दोन कारणे आहेत. एक तर हेलीकोबॅक्टर पायलोरी ह्या बॅक्टेरिया मुळे झालेल्या इन्फेक्शनने अल्सर होऊ शकतात. दुसरे कारण म्हणजे जर एखादी व्यक्ती जर सतत वेदनाशामक औषधांचे सेवन करीत असेल, तर त्यामुळे ही पेप्टिक अल्सर होऊ शकतात.

पेप्टिक अल्सर असण्याचे सर्वात प्राथमिक लक्षण म्हणजे पोटामध्ये सतत तीव्र जळजळ होणे, किंवा सतत पोट दुखणे, हे आहे. पोटदुखी निरनिराळ्या कारणांनी उद्भवू शकते, त्यामुळे पोट दुखले की पेप्टिक अल्सर झाला आहे असे समजण्याचे कारण नाही. पेप्टिक अल्सारने उद्भवणारी पोटदुखी साधारणपणे रात्रीच्या जेवणानंतर सुरु होते. पोटदुखीचे प्रमाण वाढणे किंवा कमी होणे हे मुख्यतः आपल्या आहारावर अवलंबून असते. टोमॅटो, चिंच वापरून बनविले गेलेले आंबट पदार्थ खाल्ल्याने अॅसिडीटी वाढू शकते, त्यामुळे रात्रीच्या वेळी आंबट पदार्थ खाणे टाळायला हवे. तसेच फार वेळ उपाशी रहाणे किंवा दोन जेवणांच्या मध्ये खूप अंतर असल्याने ही पोटदुखी किंवा अॅसिडीटी होऊ शकते. पोटदुखी आणि पोटात जळजळ या शिवाय मळमळणे, सतत ढेकर येणे, अपचन, भूक कमी होणे, आणि पोट फुगल्यासारखे होणे ही सुधा पेप्टिक अल्सरची लक्षणे असू शकतात. या पैकी कोणतीही लक्षणे वारंवार उद्भवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

पेप्टिक अल्सरचे निदान एका सोप्या तपासणीद्वारे करता येऊ शकते. याला ‘ अपर गॅस्ट्रोइंटेस्टीनल टेस्ट ‘ म्हटले जाते. या तपासणी दरम्यान रुग्णाला बेरियम नावाचे पांढरे द्रव पिण्यास सांगितले जाते, व त्यानंतर त्याच्या पोटाचा एक्स रे काढला जातो. ह्या पांढऱ्या द्रवामुळे पोटातील अल्सर दिसून येण्यास मदत होते. अल्सरचे निदान झाल्यानंतर औषधोपचार सुचविले जातात. या मध्ये इन्फेक्शन मुळे अल्सर झाल्यास अँटी बायोटीक्स दिली जातात. योग्य औषधोपचार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल केल्याने पेप्टिक अल्सर पूर्णपणे बरे होऊ शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment