फक्त राज ठाकरेच पुढे नेऊ शकतात बाळासाहेबांचे विचार – नितेश राणे


मुंबई – भाजप नेते नितेश राणे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर स्तुतिसुमन उधळत फक्त राज ठाकरेच बाळासाहेबांचे विचार पुढे नेऊ शकतात असे म्हटले आहे. जे बाळासाहेबांच्या विचारावर पहिल्या अर्थाने चालत होते ते राज ठाकरेच होते. आजदेखील कडवट शिवसैनिकांना विचाराल तर तेदेखील राज ठाकरे यांचेच नाव घेतील. राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका त्यांच्यासाठी साजेशी असल्याचे म्हणत नितेश राणे यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून भाषण करुन अंतरगं भगवा होत नसल्याचा टोला देखील लगावला.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्यापैकी कुणीही बाळासाहेब ठाकरेंची जयंती असताना अभिवादन केले नाही. शिवसेना, उद्धव ठाकरेंना या गोष्टी मान्य आहे का ? अशी विचारणा नितेश राणे यांनी केली आहे. संजय राऊत काही बोलले तर दिल्लीवरुन फोन येतो आणि ते शब्द मागे घेतले जाताता, असेही यावेळी राणे म्हणाले.

नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटले की, सर्वांना शब्दापलीकडे जाऊन कृतीतून तुम्ही काय करत आहात हे दिसत आहे. सकाळी संजय राऊत वेगळे बोलतात आणि संध्याकाळी त्यांची भाषा काही वेगळीच असते. पारंपारिक मतदारांची तुम्ही फसवणूक करत आहात. तुमची महाविकास आघाडीत गळचेपी, अपमान होत असल्याचे दिसत आहे. शिवसेना आगामी निवडणुकांमध्ये कुठे दिसणार नाही. तेव्हा उद्धव ठाकरेंना कोणाचे किती भगवे राहिले आहे हे कळेल. खिसे भरण्यापुरते महाविकास आघाडीचे मंत्री असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. शेतकऱ्यांचा सातबाराकोरा केला का? कर्जमाफी झाली का ? असे सवाल यावेळी त्यांनी विचारले.

Leave a Comment