निवडणूक प्रचारात वापरला जाणार नाही राजमुद्रा असलेला झेंडा – राज ठाकरे


मुंबई – मुंबईतील गोरेगावमध्ये मनसेचे पहिले अधिवेशन गुरुवारी घेण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक प्रचारासाठी राजमुद्रा असलेला झेंडा नको असे आवाहन केले आहे. आपल्या झेंड्याचा मनसेने रंग बदलला. आधी हिरवा आणि निळा रंग असलेला मनसेचा झेंडा आता पूर्ण भगवा झाला आहे. या झेंड्यामध्ये दोन प्रकार आहेत. एका झेंड्यावर राजमुद्रा आहे. तर दुसऱ्या झेंड्यावर मनसेचे पक्षचिन्ह असलेले रेल्वे इंजिन आहे. आपण निवडणूक प्रचारात रेल्वे इंजिन असलेला झेंडाच वापरायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे तो झेंडा निवडणूक प्रचारात वापरायचा नाही असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरे यांनी या अधिवेशनात भाषणाच्या सुरुवातीलाच झेंडा आवडला का? असा प्रश्न विचारला आणि त्यानंतर झेंडा का बदलला तेदेखील सांगितले. झेंडा पाच ते सहा वर्षांपूर्वीच बदलायला हवा असे मला वाटत होते. मी वर्षभरापूर्वीही विचार केला होता की आपण पक्षाचा झेंडा शिवजयंतीच्या दिवशी बदलू. पण आता एखाद्या राजकीय पक्षाच्या अधिवेशनाची परंपरा संपत चालली आहे. आपण हे अधिवेशन घेतले म्हणून या दिवशी नवा झेंडा आणायचा असे मी ठरवले. झेंड्याचा रंग बदलण्याचा संबंध काही लोक राजकीय परिस्थितीशी जोडू पाहात आहेत. पण हा निव्वळ योगायोग असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.

शिवरायांची राजमुद्रा मनसेच्या झेंड्यावर असल्यामुळे हा झेंडा हाती घ्याल तेव्हा तो कुठेही पडणार नाही, त्या झेंड्याचा अपमान होणार नाही याचीही काळजी घ्या आणि आपल्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. शिवाय निवडणूक प्रचारासाठी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. मनसेचे चिन्ह असलेला भगवा झेंडा निवडणूक प्रचारासाठी वापरायचा, असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

Leave a Comment