भारताला एक हिंदू राष्ट्र बनवू इच्छित आहेत नरेंद्र मोदी – जॉर्ज सोरोस


दावोस – अमेरिकन अब्जाधीश आणि समाजसेवक जॉर्ज सोरोस यांनी दोवास येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. सोरोस यांनी म्हटल्याप्रमाणे, भारतात राष्ट्रीयत्व आणि देशभक्तीच्या व्याख्याच बदलण्यात आल्या असून लोकशाही पद्धतीने भारतात सत्तेवर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला एक हिंदू राष्ट्र बनवू इच्छित आहेत. अर्धस्वायत्त मुस्लिम प्रांत काश्मीरात ते दंडेलशाही पावले उचलत आहेत. कलम 370 हटवणे आणि काश्मीरात निर्बंध लागू करण्याकडे त्यांचा इशारा होता. त्याचबरोबर सोरोस यांनी सीएए आणि एनआरसीवर टीका करताना भारतात राहणाऱ्या लाखो मुस्लिमांचे नागरिकत्व हिरावले जाण्याचे संकट वाढले आहे.

सोरोस पुढे बोलताना म्हणाले, सिव्हिल सोसायटीमध्ये सलग घट दिसून येत असून मानवता कमी होताना दिसून येत आहे. जगाची दिशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भाग्यावरच विसंबून आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला व्लादिमीर पुतिन, ट्रम्प आणि जिनपिंग तानाशहांसारखेच शासक आहेत. सत्ता काबिज करून ठेवणाऱ्या शासकांमध्ये वाढ होत आहे.

सोरोस यांच्या मते, सध्या इतिहासात बदलाच्या युगात आपण वावरत आहोत. सध्या खुल्या समाजाची विचारधारा संकटात आहे. त्याहून मोठे आव्हान म्हणजे, हवामान बदल. माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा प्रकल्प आता ओपन सोसायटी यूनिव्हर्सिटी नेटवर्क (ओएसयूएन) आहे. हे एक असे व्यासपीठ राहील, ज्यात जगातील सर्वच विद्यापीठाचे लोक शिकवू शकतील आणि स्वतः संशोधन सुद्धा करतील. ओएसयूएनसाठी मी जवळपास 7100 कोटी रुपये गुंतवणार आहे.

Leave a Comment