न्यूझीलंडवर भारताची ६ गडी राखून मात


ऑकलंड – भारताने पहिल्या टी-२० सामन्यात सलामीवीर लोकेश राहुलचे अर्धशतक आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली उत्तम साथीच्या जोरावर नवीन वर्षाच्या पहिल्याच परदेश दौऱ्यात विजयाची नोंद केली आहे. भारताने ६ गडी राखत न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले २०४ धावांचे आव्हान पूर्ण केले. या सामन्यात लोकेश राहुलने ५६ तर विराट कोहलीने ४५ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये श्रेयस अय्यरनेही फटकेबाजी करत नाबाद ५२ धावा केल्या. भारताने पहिल्या सामन्यातील विजयासह मालिकेत १-० ने आघाडीही घेतली आहे.

भारतीय डावाच्या सुरुवातीलाच सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. पण लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी यानंतर संयमी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. योग्य चेंडूवर फटकेबाजी करत दोन्ही फलंदाजांनी संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. यादरम्यान लोकेश राहुलने आपले अर्धशतकही साजरे केले. राहुल ५६ धावांवर सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण मोक्याच्या षटकांमध्ये विराट माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

Leave a Comment