एक्स्पायर झालेली सौंदर्यप्रसाधने कशी वापराल?


सर्वच महिला सौंदर्यप्रसाधनांची खरेदी अगदी हौशीने करतना दिसतात. पण ही सौन्दर्यप्रसाधने काही काळानंतर वापरण्याजोगी रहात नाहीत. जशी औषधे काही काळानंतर एक्स्पायर होतात, तशीच सौंदर्यप्रसाधनांनादेखील ठराविक कालमर्यादा असते. मग अश्यावेळी एक्स्पायर झालेल्या सौंदर्यप्रसाधनांचे काय करायचे हा महिलांपुढला मोठाच प्रश्न असतो. या एक्स्पायर झालेल्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून काही वेगळ्या गोष्टी करून बघता येतील.

डोळ्यांच्या पापण्यांना लावण्याचा मस्कारा साधारण सहा ते आठ महिन्यांमध्ये एक्स्पायर होऊन जातो. मस्कारा जरी वापरता येण्यासारखा राहिला नसला, तरी त्यातील ब्रश मात्र वापरता येतो. हा ब्रश स्वच्छ धुवून साफ करून ठेवावा. ओठांवरील मृत पेशी हटविण्यासाठी या ब्रश वर थोडेसे खोबरेल तेल घालून, ब्रशने हळुवार ओठ घासावेत. या उपायाने ओठ मुलायम होतील व त्यांचा कोरडेपणाही दूर होईल.

आय शॅडो ( पापण्यांच्या वर लावण्याचे रंग ) साधारण एका वर्षामध्ये एक्स्पायर होतात. अशी एक्स्पायर झालेली आय शॅडो आपल्याकडे असल्यास ती डबीतून काढून घ्या आणि ती पूड क्लिअर ( रंगहीन ) नेल पॉलिश मध्ये मिसळा..तुमच्या आवडीच्या रंगाचे नेल पॉलिश तयार..

बहुतेक सर्व स्कीन टोनरमध्ये अल्कोहोल असतेच. एकदा हे स्कीन टोनर एक्स्पायर झाले की त्याचे काय करायचे हा प्रश्नच असतो. अल्कोहोल काचेच्या सफाई करिता अतिशय उत्तम असते. त्यामुळे एक्स्पायर झालेले स्कीन टोनर घरातील काचेच्या वस्तू चमकविण्याकरिता वापरा.

एक्स्पायर झालेले लिप बाम चामड्याचे बूट किंवा सँडल्स पॉलिश करण्याकरिता वापरा. जर पर्स ची झिप ( चेन ) अडकत असेल, तर त्यावर लिप बाम चोळा, त्याने चेन व्यवस्थित सरकू लागेल. जर पायाची त्वचा संवेदनशील असेल, तर नवीन बूट किंवा चप्पल मुळे त्वचा लाल होते. यासाठी नवीन बूट किंवा चप्पल घालण्याआधी पायाला लिप बाम लावा.

कित्येक वेळा लिपस्टिक तुटते, आणि वापरण्याजोगी रहात नाही. अशा वेळी लिप्स्टिक वितळवून त्यामध्ये पेट्रोलियम जेली मिसळून घरच्या घरी लिप बाम तयार करा.

Leave a Comment