गर्भवतींसाठी व्यायाम कसा असावा ?


प्रत्येक गर्भवती महिलेला आपली प्रसूती सुखरूप होईल की नाही याची चिंता असते. आपली प्रसूती नैसर्गिक होईल की शस्त्रक्रिया करावी लागेल अशी काळजी तिला लागलेली असते. आजकाल बहुसंख्य गर्भवती महिलांना बेड रेस्ट सांगितली जाते. अन्यथा प्रसूतीत त्रास होईल असे बाजावले जाते पण जुन्या काळातल्या महिलांना हे मान्य नसते. त्या आपल्या काळातले अनुभव सांगायला लागतात. आपण प्रसूती जवळ येईपर्यंत कशी कामे करीत होतो आणि तरीही आपल्याला कसलाच त्रास कसा झाला नाही याची वर्णने त्या करीत असतात. पण सत्य काय आहे ? गर्भवती महिलांनी जड कामे करावीत का ? आजच्या काळात याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल कारण आजकाल महिलांना मुळातच कष्टाच्या कामाची सवय राहिलेली नाही.

अर्थात गर्भवतीने फार आराम करावा हेही योग्य नाही. तिने सुलभ प्रसूतीसाठी व्यायाम करणे फार जरूर आहे. दुर्दैवाची बाब अशी की गर्भवतीने व्यायाम करायचा नसतो असा मोठा गैरसमज आहे. या सगळ्या गोंधळातून शेवटी गर्भवतीने कोणता व्यायाम करावा हे नीट समजून सांगण्याची गरज आहे. गर्भवतीने गरोदरावस्थेत सक्रिय असले पाहिजे असा सल्ला योग तज्ज्ञ देत असतात. त्यातच व्यायामाचा समावेश होतो. व्यायाम न केल्यास या अवस्थेत मधूमेह, रक्तदाब यांचा प्रादुर्भाव होण्याची भीती असते. काही महिला दिवस भरण्याच्या आत प्रसूत होतात. गर्भारपणात व्यायाम करणार्‍या महिलांच्या बाबतीत अशी मुदतपूर्व प्रसूती टाळण्यास मदत होते. तसा विचार केला तर अनेक महिलांच्या मनावर प्रसूतीचा तणाव असतो. स्पेनमध्ये केलेल्या प्रयोगात असे दिसून आले आहे की, व्यायाम करणार्‍या गर्भवतींवर असा तणाव कमी असतो. या तणावाचा परिणाम जन्माला येणार्‍या मुलावरही होऊ शकत असल्याने गर्भवतींनी जरूर व्यायाम केला पाहिजे.

गर्भारपणात व्यायाम केल्याने या अवस्थेत वजन वाढत नाही आणि त्यामुळे सुलभ प्रसूती शक्य होते. या अवस्थेत व्यायाम करणार्‍या महिलांचे सिझेरियन होण्याचे प्रमाण कमी आहे. तसे ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या पाहण्यांत दिसून आले आहे. काही महिलांना जादा वजनांची मुले होतात. हाही एक प्रश्‍न आहे. पण व्यायाम करणार्‍या महिलांत अशा मुलांचा जन्म होण्याचे प्रमाण कमी आहे. या अवस्थेत रोज २० मिनिटे चालणे हा सर्वात चांगला व्यायाम आहे. योगासने करायची असतील तर पोटावर दाब येईल अशी आसने टाळावीत आणि ती योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच करावीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment