असा हॅक झाला होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा फोन

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या आयफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आलेल्या 4.4 मेगाबाईट्स आकाराच्या व्हिडीओने त्यांचा फोन हॅक करण्यात आला होता. या व्हिडीओमधील एका छोट्याशा फाइलने फोन हॅक झाला होता. ही केवळ 14 बाइट्सची मालवेअर सॉफ्टवेअर असणारी फाइल होती, जी त्यांच्या फोनमध्ये इंस्टॉल झाली. या फाइलने फोनमधील सर्व डेटा चोरी केला होता. याबाबतचा खुलासा जेफ यांच्याद्वारे हॅकिंगचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ञांनी केला आहे.

तज्ञांच्या फॉरेंसिक रिपोर्टचा उल्लेख संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार शाखेद्वारे जारी एका लेखात करण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार, जेफ यांच्या आयफोन 10 वर मे 2018 मध्ये सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या व्हॉट्सअ‍ॅप वरून एक मेसेज आला. ज्यामध्ये सौदी अरेबिया आणि स्विडनचा ध्वज व अरबी भाषेत काहीतरी लिहिण्यात आलेले होते. जेफ यांनी हा संदेश उघडताच त्यांच्या फोनमधील डेटा दुसऱ्या लोकेशनवर जाऊ लागला.

पुढील काही महिन्यात फोनमधून जवळपास 4.6 जीबी डेटा अन्य लोकेशनवर पाठविण्यात आला. या वेळी त्यांचे ईमेल, वेब अपलोड, फोन आणि क्लाउट स्टोरेज देखील तपासले गेले.

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की खाजगी सुरक्षा कंपनी एनएसओद्वारे जेफ यांची हेरगिरी करण्यासाठी हे करण्यात आले. जेफ बेझॉस हे अमेरिकन वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्टचे मालक असून, त्याचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येचे आरोप सौदी सरकावर लागले होते.

जेफ बेझॉस अथवा अ‍ॅमेझॉनकडून यावर काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. व्हॉट्सअ‍ॅपची मालकी कंपनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गने देखील यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. सौदी सरकारने मात्र याचे खंडन केले आहे.

या आरोपानंतर 22 जानेवारीला जेफ बेझॉस यांनी खाशोगी यांच्या शवपेटीला हात लावतानाचा फोटो शेअर केला आहे. यावरून जेफ यांची नाराजी स्पष्ट दिसत आहे.

Leave a Comment