‘या‘ वस्तू कोणासही वापरण्यास देऊ नका


आपण घरामध्ये किंवा होस्टेलमध्ये इतर लोकांसह एकत्र राहत असताना अनेकदा एकमेकांच्या वस्तू वापरत असतो. पण काही वस्तू अश्या आहेत, ज्या इतरांना वापरू देणे किंवा इतरांच्या वस्तू आपण वापरणे आजारास आमंत्रण ठरू शकते. इतरांनी वापरलेले टूथ ब्रश जसे आपण कटाक्षाने वापरण्याचे टाळतो, त्याचप्रमाणे इतरांनी वापरलेले कंगवे किंवा हेअर पिन्स वापरणे टाळायला हवे. कंगवे आणि हेअर ब्रश यांचा आपल्या केसांच्या मुळांशी किंवा त्वचेशी थेट संबंध येत असतो. आपल्या किंवा इतरांच्या डोक्यामध्ये राहणारा घाम, कोंडा इत्यादी कंगव्यावर ही येतच असतात. या मुळे कंगव्यावर बॅक्टेरिया देखील असतात. कंगव्या मार्फत हे जीवाणू एका व्यक्तीच्या केसातून दुसऱ्या व्यक्तीच्या केसांमध्ये सहज प्रवेश मिळवू शकतात. त्यामुळे इतरांचे कंगवे वापरणे टाळावे, आणि त्याचबरोबर कंगवे नियमितपणे साफ ही करावेत.

तसेच आपण वापरत असलेले बूट किंवा चपला शक्यतो इतरांना वापरण्यास देऊ नये. आपण घालत असलेल्या बुटांमध्ये पावलांना आलेल्या घामामुळे जीवाणू उत्पन्न होत असतात. त्यामुळे बूट काढल्यानंतर हवेशीर ठिकाणी ठेवावेत, आणि अधून मधून त्यामध्ये बोरिक पावडर घालून ठेवावी, जेणेकरून बुटातील जीवाणू नष्ट होतील. त्याचप्रमाणे महिलांनी एकमेकींचे मेकअप ब्रश, किंवा स्पंज वापरणे कटाक्षाने टाळावे. एकमेकींची सौंदर्यप्रसाधने, विशेषतः त्वचेशी थेट संपर्कात येणारी प्रसाधने ( लिपस्टिक इत्यादी ) वापरणे टाळावे.

आजकाल सर्वचजण मोबाईल फोन वरून संगीत ऐकण्याकरिता हेड फोन्स चा वापर करत असतात. पण आपले हेड फोन्स इतरांना वापरायला देणे कटाक्षाने टाळायला हवे. आपल्या कानांमधील जीवाणू हेड फोन्स मार्गे इतरांच्या कानामध्ये शिरून कानाचे इन्फेक्शन उद्भवू शकते. या करिता आपण ही इतरांचे हेडफोन्स वापरणे शक्यतो टाळायला हवे. कंगवे, आणि टूथब्रश प्रमाणे इतरांनी वापरलेले टॉवेलही वापरणे आवर्जून टाळायला हवे.

Leave a Comment