कोरोना पीडितांसाठी अवघ्या १० दिवसात हॉस्पिटल बांधणार चीन


नवी दिल्ली – चीन येत्या दहा दिवसात घातक अशा कोरेना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवे हॉस्पीटल बांधणार आहे. हे हॉस्पीटल या आजाराचे मुख्य केंद्र असलेल्या वुहान शहरातच उभारण्यात येणार असून, त्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दिवसेंदिवस चीनमध्ये कोरोना विषाणुंची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

फक्त कोरोना विषाणुची लागण झालेल्या रुग्णांसाठी येत्या तीन फेब्रुवारीपासून या हॉस्पीटलाचा वापर करण्याचा चीनचा उद्देश आहे. आतापर्यंत २६ जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. चीनमधील काही शहरे कोरोना विषाणूचा प्रसाररोखण्यासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.

चीनमधील सरकारी एका वृत्तवाहिनीवर हॉस्पीटल बांधणीसाठी सुरु असलेल्या कामाचा व्हिडीओ दाखवण्यात आला. त्याचबरोबर शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हे हॉस्पीटल २५ हजार स्कवेअर मीटरमध्ये उभे राहणार असून त्यामध्ये १ हजार खाटांची व्यवस्था असेल. आतापर्यंत ८३० लोकांना चीनमध्ये या विषाणूची लागण झाली आहे. २००३ साली सार्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने बिजींगच्या हद्दीबाहेर आठवडयाभराच्या आत हॉस्पीटल उभारले होते.

Leave a Comment