चहाला ग्लॅमर देण्याचे काम ‘येवले’ने केले


पुणे – चहावर कारवाई झाल्याचे आतापर्यंत आपण कधीच ऐकले नव्हते. पण येवले अमृततुल्य हे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्याचे पहिलेच नाव असून अन्न आणि औषध प्रशासनाने येवले चहामध्ये भेसळ असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला. कृत्रिम रंगाचा वापर या चहामध्ये होत असल्याचे अहवालातून सिद्ध झाल्यानंतर संबंधित प्रकरणावर येवले चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

लोकांनी येवले चहाला डोक्यावर गुणवत्तेच्या जोरावर घेतल्याचे सांगताना येवले अमृततुल्यने चहाला ग्लॅमर मिळवून देण्याचे काम केले आहे. अनेक चहा विक्रेत्यांनी आमच्यामुळे आपल्या चहाच्या गुणवत्तेत सुधारणा केली असून ग्राहकांच्या आरोग्याला हानी पोहोचवणारे कोणतेही कृत्य आमच्याकडून होणार नसल्याचे स्पष्टीकरण संचालक नवनाथ येवले यांनी दिले आहे.

रंगाचा वापर फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (FSSAI) गाईडलाईन नुसार करणे गुन्हा असल्याची माहिती समोर आली. यावर बोलताना, आधी मेलामाईन, आता कलर, पुढे आणखी काय असेल, माहीत नाही, असे येवले म्हणाले. पहिल्या कारवाईच्या वेळी अन्न व औषध प्रशासनाला काही त्रुटी आढळून आल्या होत्या. आम्ही त्या त्रुटी दूर केल्याची माहिती येवले यांनी दिली. त्यानंतर चहाचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आल्याचे ते म्हणाले. चहासाठी वापरत असलेले साहित्य चांगल्या दर्जाचे असल्याचे सांगण्यात आले. येवले चहामध्ये रंग मिसळत असल्याच्या बातम्या आज अचानक ऐकल्या. पण आम्हाला याविषयी अन्न व औषध प्रशासनाकडून कोणतीही नोटीस आली नसल्याची माहिती येवले यांनी दिली. तसेच चहात कोणत्याही प्रकारचा रंग मिसळण्यात येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जसजसे येवले अमृततुल्य चहाचे नाव मोठे होत आहे, तसतसे याचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नात अनेकजण असल्याचा आरोप येवले यांनी केला. कुठलाही व्यवसाय मोठा होत असताना अडचणी येत असतात. परंतु, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळून पैसे कमवणे आमचे उद्दिष्ट नसल्याचे ते म्हणाले. पण येवले चहाविषयी ज्याप्रकारे अफवा पसरवल्या जात आहेत, याप्रकारचे कृत्य येवले चहाकडून होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment