नाईट लाईफसाठी ही शहरे आहेत प्रसिद्ध


मुंबई शहरामध्ये 26 जानेवारीच्या रात्रीपासून ‘नाईट लाईफ’ला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण आपल्यापैकी अनेकांना नाईट लाईफचा नेमका अर्थ माहित नाही. रात्री ११ नंतर पहाटेपर्यंत हॉटेल्स, पब, बार, सिनेमागृहे, म्युझिक कॉन्सर्टस्, डिस्को डान्स, पार्ट्यांचा आनंद घेण्याला नाईट लाईफ असे म्हणतात. जगभरामध्ये नाईट लाईफसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांमध्ये आता मुंबईचाही समावेश झाला आहे.

तरुण पिढीच नाईट लाईफचा जास्त आनंद घेतात दिवसा चालणाऱ्या मनोरंजनापेक्षा नाईट लाईफ ही संकल्पना थोडी वेगळी म्हणजेच ‘अ‌ॅडल्ट ओरियेंटेड’ असून पबमध्ये रात्रभर बसून ड्रिंक्स् घेणे, नाचगाणी, चित्रपट पाहणे, रात्रीचे रस्त्यावर मुक्तपणे फिरणे अशा गोष्टी केल्या जातात. मोठ्या शहरांमध्ये अनेक पर्यटक नाईट लाईफचा आनंद घेतात. आज आम्ही तुम्हाला नाईट लाईफसाठी प्रसिद्ध असलेल्या त्याच शहरांची माहिती सांगणार आहोत.

‘सिटी दॅट नेव्हर स्लीप’ म्हणजेच कधीही न झोपणारे शहर अशी न्यूयॉर्क शहराची ओळख आहे. या शहरातील ‘टाईम्स स्क्वेअर’ हा भाग कायम उजळ असतो. रात्रभर या भागातील बार, पब, म्युझिक शो सुरू असतात, नवीन वर्षाचे स्वागत असो अथवा ख्रिसमस किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असला तर या ठिकाणी नागरिकांची झुंबड उडते. बेस्ट पार्टी डेस्टिनेशन म्हणूनही न्यूयॉर्कला ओळखले जाते.

नाईट लाईफसाठी थायंलडची राजधानी बँकॉक हे शहरही ओळखले जाते. बार आणि पबमध्ये येथील काही भागातील घरांचे रूपांतर करण्यात आल्यामुळे यातून थायलंडची संस्कृतीही पाहायला मिळते. तसेच रस्त्याच्या कोणत्याही कोपऱ्यात थाई फुड तुम्हाला मिळते.

नाईट लाईफसाठी ब्राझीलमधील रिओ डी जेनिरीओ हे शहर ओळखे जाते. येथे तुम्हाला शनिवारी आणि रविवारी चुकून एखादा पब रिकामा सापडतो. तेथे काहीजण लवकर पार्टी उरकतात, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना समुद्र किनाऱ्यावर जायचे असते.

या शहरांसोबतच नाईट लाईफसाठी दक्षिण कोरियातील सेऊल, अमेरिकेतील मायामी, लास वेगास, आर्यलॅंडमधील डबलीन, बोलिव्हियामधील ला पाझ, दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन, जर्मनीतील बर्लिन आणि इतरही शहर प्रसिद्ध आहेत.

जवळजवळ सर्वच शहरांमध्ये नाईट लाईफ समान धाग्यावर आधारीत असते. प्रत्येक शहरामध्ये पब, डान्सबार, हॉटेल्स, कॉन्सर्ट अशी आकर्षणे असतात. फक्त त्यात विविध देशांतील संस्कृतीनुसार बदल होतो. नागरिकांच्या मनोरंजनाची व्याख्याही बदलत्या जीवनशैलीनुसार बदलायला लागली आहे. दिवसभर काम केल्यानंतर मोठ्या शहरांमध्ये रात्रीच्यावेळी एन्जॉय करण्याची पद्धत रुजु झाली आहे. सहाजिकच यावर काही बंधने असतात आणि बऱ्याच ठिकाणी निवासी भाग वगळून अशा नाईट लाईफला परवानगी देण्यात येते.

Leave a Comment