महिला आणि मुलींसाठी नाईट लाईफ ही अत्यंत धोकादायक – रामदास आठवले


नाशिक – नाशिक विभागातील मागील पाच वर्षांच्या विविध योजनांच्या सद्यस्थितीबाबत सामाजिक न्याय व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आठवलेंच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमचा मुंबईतील नाईट लाईफला विरोध असून नाईट लाईफमुळे गुन्हेगारांचे फावेल आणि महिला-मुलींची सुरक्षितता धोक्यात येईल. मी नाईट लाईफबद्दल आदित्य ठाकरेंच्या मताशी सहमत नाही. महामार्गावर ढाबे सुरू असणे ठीक आहे. पण शहरात नको. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करू नये, असेही रामदास आठवले म्हणाले.

इंदू मिलला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली असली तरी आमची मते राष्ट्रवादीला मिळणार नाही. सर्व काही फक्त मतांसाठी होत असल्याची टीका आठवलेंनी केली. मी जोपर्यंत मोदींसोबत आहे, तोपर्यंत आमची मते कोणालाही मिळणार नाहीत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदूमिलमधील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच त्या स्मारकाचे नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन व्हावे ही आमची मागणी असल्याचे आठवले म्हणाले. तसेच वाडिया रुग्णालयाला निधी द्यायला आमचा विरोध नाही. पण, स्मारकाचा पैसा देऊ नये. इतर निधी द्यावा, असेही ते म्हणाले.

त्याचबरोबर देशातील मुस्लीम बांधव आणि नागरिकांविरोधात सीएए नाही. केवळ सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. यामध्ये मुस्लिमांचा बळी दिला जात असून डावे आणि काँग्रेस मागे बसून मुस्लिमांना पुढे करत असल्याचा आरोप रामदास आठवलेंनी केला.

Leave a Comment