या राज्यांनाही आहेत एकापेक्षा जास्त राजधान्या


तेलंगाणा वेगळे काढल्यावर नव्याने बनलेल्या आंध्रप्रदेश राज्याला तीन राजधान्या ठेवण्याचा प्रस्ताव २० जानेवारीला मंजूर झाल्यावर त्यावर देशभरात चर्चा सुरु झाली आहे. या प्रस्तावानुसार अमरावती मुख्य, विशाखापट्टनम कार्यकारी तर कर्नुल न्यायिक राजधानी असेल. पण अश्या वेगळ्या राजधान्या असणारे आंध्र हे एकमेव राज्य मात्र नाही. दोन राजधान्या असणारी काही राज्ये भारतात आहेत.

हिमाचल प्रदेशची मुख्य राजधानी सिमला आहे. पण २ मार्च २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विदर्भसिंग यांनी धर्मशाळा ही दुसरी राजधानी घोषित केली आहे. उत्तराखंड राज्यात दुसऱ्या राजधानीचा प्रश्न जटील बनला आहे. २००० साली उत्तराखंड वेगळे राज्य बनल्यापासून देहरादून ही या राज्याची राजधानी आहे. मात्र पहाडी शहर गैरसन येथे राजधानी असावी अशी मागणी जोर धरून आहे. या शहरात विधानसभा भवन बांधले गेले असून दरवर्षी विधानसभेचे एक सत्र येथे भरणार आहे.


महाराष्ट्राला सुद्धा दोन राजधान्या आहेत. मुख्य राजधानी मुंबई आणि नागपूर ही दुसरी राजधानी. हिवाळी अधिवेशन या राजधानीत होते. १९५३ मध्ये जेव्हा नागपूर समझोता झाला तेव्हा महाराष्ट्र स्थापनेनंतर दरवर्षी विधानसभेचे किमान ६ आठवड्यांचे एक सत्र नागपूर येथे भरविले जावे असा निर्णय झाला होता. या सत्रात विदर्भ विकास संदर्भात चर्चा केली जावी असे ठरले होते. त्याप्रमाणे दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेतले जाते.

जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर आहे. पूर्वी जेव्हा हा प्रदेश केंद्रशासित होता तेव्हा पासून म्हणजे १८६२ पासून डोग्रा शासक गुलाबसिंग यांनी दोन राजधान्यांची प्रथा सुरु केली आहे. उन्हाळ्यात मुख्य राजधानी श्रीनगर असली तरी हिवाळ्यात जम्मू राजधानी असते आणि या प्रक्रियेला दरबार मुव्ह असे म्हटले जाते.

Leave a Comment