मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरेंची निवड


मुंबई: आजपासून राज ठाकरे यांच्या मुलाची मनसे नेते अमित ठाकरे अशी नवी ओळख असणार आहे. कारण की, अमित ठाकरे यांची मनसेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. आपल्याला अनेक आश्चर्याचे धक्के मनसेच्या अधिवेशनात मिळतील, असे मनसे नेत्यांकडून सांगण्यात आले होते. त्याप्रमाणेच मनसे सुरुवातीला शॅडो कॅबिनेट आणि नंतर अमित ठाकरेंची नेतेपदी निवड करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

व्यासपीठावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी येत अमित ठाकरे यांच्या नेतेपदाचा ठराव मनसैनिकांसमोर मांडल्यानंतर हा ठराव आवाजी मतदानाने संमत करुन घेण्यात आला. अमित ठाकरे यांना यावेळी व्यासपीठावर बोलावून त्यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला. या निवडीनंतर तात्काळ अमित ठाकरे यांनी एक शैक्षणिक ठराव देखील मांडल्यामुळे अमित ठाकरे हे यापुढे शैक्षणिक प्रश्न सोडविण्याच्या माध्यमातून युवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील.

मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची निवड झाल्यानंतर ते आता सक्रीय राजकारणात आपल्याला दिसून येतील. ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीतील आणखी एक व्यक्ती अमित ठाकरे यांच्या रुपाने आता राजकारणात उतरला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे मंत्रिपदी विराजमान झाल्यापासून अमित ठाकरे यांचे पॉलिटिकल लाँचिंग व्हावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर आजच्या अधिवेशनात अमित ठाकरे यांचे अधिकृत लाँचिंग करण्यात आले.

गेले अनेक वर्ष मनसे म्हणजे राज ठाकरे असे समीकरण होते. पण, आता स्वत: अमित ठाकरे राजकारणात सक्रीय होत असल्याने मनसेला एक मोठा नेता मिळणार आहे. दरम्यान, असे असले तरीही राज ठाकरे यांचा मुलगा म्हणून त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना अनेक अपेक्षा असणार आहेत. त्यामुळे आगामी काळात अमित ठाकरे या अपेक्षा कशा पूर्ण करणार हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.

Leave a Comment