काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत भारताच्या कोपऱ्या कोपऱ्यात नैसर्गिक सुंदरता ओसांडून वाहते. अनेक ठिकाणी असे नैसर्गिक रहस्य आहेत, ज्याने सर्वचजण हैराण होतात. आज अशाच एका फुलाबद्दल जाणून घेऊया, जे तब्बल 12 वर्षानंतर एकदा फुलते. हे फुल बघायला लांबून लोक येतात.
देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमधील मुन्नार येथील पठारांवर हे खास फुल उगवते. या फुलाचे नाव ‘नीलकुरिंजी’ आहे. नीलकुरिंजी जगभरातील दुर्मिळ फुलांमध्ये समाविष्ट आहे. हे फुल 12 वर्षात एकदा फुलते.

वर्ष 2018 मध्ये हे फुल फुलले होते. केरळचे लोक याला कुरिंजी देखील म्हणतात. हे स्ट्रोबिलेंथस नावाची एक प्रजाती आहे. याच्या जवळपास 350 फुलांच्या प्रजाती भारतातच आढळतात. काही प्रजाती 4 वर्षात फुलतात, तर काही 8, 10, 12 आणि 16 वर्षांनी देखील फुलतात. मात्र ही फुले फुलून कधी नष्ट होतात, कोणाच्याच लक्षात येत नाही.
ही फुले ऑगस्ट महिन्यात फुलतात व ऑक्टोंबरपर्यंत असतात. तोडस, मथुवंस आणि मनडियास जातीचे आदिवासी या फुलांची पुजा करतात. 2006 मध्ये केरळच्या जंगलातील 32 वर्ग किलोमीटरचे क्षेत्र या फुलांच्या संरक्षणासाठी सुरक्षित ठेवण्यात आले. या जागेला कुरिंजीमाला सँक्चुअरी नाव देण्यात आले.

नीलकुरिंजी एक मोनोकार्पिक झाड आहे. म्हणजेच एकदा फुल आल्यानंतर याचे झाड देखील नष्ट होते. पुन्हा नव्याने येण्यासाठी वाट पाहावी लागते. या फुलाचे भारतात सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. केरळच्या मुथुवन जनजातीचे लोक या फुलाला प्रेमाचे प्रतिक मानतात.
वर्ष 2018 मध्ये या फुलाच्या स्वागतासाठी मुन्नारमध्ये मोठी तयारी करण्यात आली होती. लाखो पर्यटक येण्याची आशा होती. मात्र त्याचवर्षी केरळमध्ये मोठा पूर आला होता.

नीलकुरिंजीच्या फुलापेक्षा त्याचे मध सर्वाधिक दुर्मिळ आहे. त्याला कुरिंजीथन म्हणतात. या फुलाचा रस मधमाशांना खूप आवडतो. हे दुर्मिळ मध स्थानिक आदिवासी काढू शकतात. मात्र बाजारात विकू शकत नाहीत. स्थानिक लोकांनुसार, यात औषधीय गुण आहेत. मात्र यावर अद्याप संशोधन झालेले नाही.
आता हे फुल वर्ष 2030 मध्येच फुलेल. मात्र किती प्रमाणात फुलेल हे सांगणे अवघड आहे. कारण शहरीकरणामुळे त्याच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत.