एफडीएच्या अहवालातून येवले चहामध्ये भेसळ असल्याचे उघड


पुणे – अन्न आणि औषध प्रशासनाने जनसामान्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या येवले चहा’ला दणका दिला आहे. याबाबत माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, येवले चहामध्ये भेसळ असल्याचे उघड झाले आहे. या चहामध्ये भेसळ असल्याचे केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेच्या अहवालात समोर आले आहे. या चहामध्ये रंग टाकत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) कोंढव्यातील २४ सप्टेंबर २०१९ रोजी येवले चहाचे उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. चहासाठी मिनरल वॉटर वापरले जाते. चहामुळे पित्त होत नाही, असा दावा केल्यामुळे सह आयुक्त एस. एस. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली होती.

त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, पँकबंद मालावर कोणती माहिती नसणे अशा विविध नियमांचे उल्लंघन आणि त्रुटीमुळे पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मेलानाईटचा वापर येवले चहामध्ये केला जात असल्याचे वृत्त पसरल्यानंतर कोंढव्यातील येवले फूड प्रॉडक्ट येथे एफडीएने तपासणी केली होती.

एफडीएने चहा पावडर, चहा मसाल्याचे नमुने आणि सहा लाखांचा साठा जप्त केला होता. प्रयोगशाळेत हे सर्व अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येत नाही तोपर्यंत हे उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले होते.

Leave a Comment