यंदाच्या बालवीर पुरस्कारात महाराष्ट्राचे दोन वीर


येत्या प्रजासत्ताक दिनी देण्यात येणारया राष्ट्रीय बालवीर पुरस्कारासाठी २२ जणांची निवड झाली असून त्यात १० मुली आणि १२ मुले आहेत. यात महाराष्ट्रातील औरंगाबादचा आकाश खिलारे आणि मुंबईची झेन सदावर्ते या दोघांचा समावेश आहे. झेन या १२ वर्षीय मुलीने इमारतीला लागलेल्या आगीतून १७ जणांची सुखरूप सुटका केली होती. तिने आग लागताच शाळेत शिकविलेल्या आपत्कालीन संकट प्रशिक्षणाचा उपयोग करून १७ जणांना बाल्कनीत बसविले आणि अग्निशमन दलाने त्यांची सुखरूप सुटका केली. तर आकाश याने नदीत बुडत असलेल्या मायलेकींचा जीव वाचविला होता.


अन्य पुरस्कारप्राप्त विरांमध्ये दोन काश्मिरी मुले आहेत. कुपवाडा येथील सरताज मोहिद्दीन आणि बडगाम येथील मुदासीर अशरफ अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी केलेल्या साहसी कृत्यासाठी त्यांची निवड भारतीय बाल कल्याण समितीने केली आहे. केरळच्या कोझिकोड मधील १६ वर्षीय मुहम्मद मुह्सीन याला मरणोत्तर अभिमन्यू पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या एप्रिल मध्ये त्याने समुद्र खवळला असताना त्याच्या तीन साथीदरांचा जीव वाचविला होता मात्र त्यात तो स्वतः मृत्युमुखी पडला होता.

पुर आलेला असताना रुग्णवाहिकेला रस्ता दाखविणारा कर्नाटकचा वेंकटेश याची बालवीर पुरस्कारासाठी निवड झाली आहे तसेच कालिकत येथील युनियन पेन्शनर फोरमच्या २० सदस्यांना अपघातातून सुखरूप बाहेर काढणाऱ्या केरळच्या आदित्य याचाही या सन्मानात समावेश आहे. त्याने डोंगरावरून उतरणाऱ्या बसला अचानक आग लागल्यावर प्रसंगावधान राखून बसच्या काचा फोडून २० जणांना बाहेर काढले होते. आदित्य याच बसमधून प्रवास करत होता.

Leave a Comment