रशियातील स्टोन रिव्हरचे रहस्य आजही कायम


फोटो सौजन्य अम्युझिंग प्लॅॅनेट
नदी म्हटली की त्यात दगड, गोटे, वाळू आणि पाणी हवेच. पण एखादी नदी नुसती दगडांची असेल आणि त्यात पाण्याचा टिपूस नसेल तर? अशी एक नदी रशियात असून या नदीचे रहस्य अनेक वर्षानंतरही वैज्ञानिक उलगडू शकलेले नाहीत. हा निसर्गाचा चमत्कार मानला जातो. रशियाच्या टगानी पार्क, दक्षिण उरल पर्वताजवळ ही दगडांची नदी आहे. तिला स्टोन रन असेही नाव आहे.


वैज्ञानिकांच्या मते १० हजार वर्षापूर्वी ग्लेशियर कोसळून हे महाकाय दगड डोंगर उतरवून खाली आले असावेत. विशेष म्हणजे या दगडी नदीच्या किनाऱ्याला पाईन वृक्ष आहेत. पण नदी पात्रातील काही प्रचंड अणकुचीदार शिळा जमिनीत खोलवर घुसल्या आहेत व त्यामुळे या पात्रात गवताचे पातेही उगवत नाही.


सुमारे सहा किलोमीटर लांबीची ही स्टोन रिवर काही ठिकाणी २० मीटर रुंद आहे तर काही ठिकाणी तिची रुंदी २०० ते ७०० मीटर इतकी आहे. या नदीतील काही शिलांचे वजन १० टनापर्यंत आहे. इतक्या प्रचंड प्रमाणावर हे दगड कुठून आणि कसे आले याचे रहस्य कायम आहे. अर्थात या नदीचे दर्शन घ्यायचे असेल तर प्रत्यक्ष पात्रात जाऊन त्याची मजा घेता येणार नाही. वरून उंचावरून ही स्टोन नदी पहिली तरच तिचा हा चमत्कार थक्क करणारा ठरतो.

Leave a Comment